भुयारी गटर योजनेत समावेष न झालेल्या 2000 घरांचे सांडपाणी गटारात

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

सुनिता शिंदे
कराड, दि. 13 (प्रतिनिधी) – स्वच्छ सुंदर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कराड शहरातील चक्‍क 2 हजार कुटुंबांचा भुयारी गटार योजनेत समावेशच झालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबातील सांडपाणी थेट गटारात जात असल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत जनशक्‍ती आघाडीचे नगरसेवक विजय वाटेगांवकर यांनी पालिकेच्या होणाऱ्या मासिक सभेत अनेक वेळा विषय मांडूनही प्रशासनाचे अधिकारी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करताना दिसत आहेत.
कराड शहरात सन 1970-71 साली भुयारी गटार योजना अंमलात आणण्यात आली. या योजनेत शहरातील सर्व कुटुंबांना सामावून घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु कराड शहरातील सोमवार पेठ व भाजी मंडईतील ठराविक भाग वगळता सर्व भागात ही योजना अंमलात आणण्यात आली. भुयारी गटर योजनेमुळे सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने गटर योजनेसाठी प्रतिवर्षी होणारा खर्चही कमी होवून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी ही योजना लाभधारक अशी ठरली आहे.
स्वयंपाक घरातून येणारे तसेच स्वच्छतागृहातून येणारे पाणी थेट गटारांमध्ये जात असल्याने तेथे अन्नपदार्थ अडकून गटारे तुडुंब भरली जातात. परिणामी गटारांमध्ये घुशींचे प्रमाण वाढते. तसेच दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाणही वाढण्यास मदत होते. यामुळे साथीचे रोग पसरून नागरिक आजारी पडतात. तसेच घुशींमुळे ठिकठिकाणी गटारेही उद्‌ध्वस्त झाली आहेत. प्रतिवर्षी पालिकेला गटारे दुरूस्तीसाठी करोडो रूपये घालावे लागतात. याचा अभ्यास करून तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून नगरसेवक वाटेगांवकर हे गेली दोन वर्षे पालिकेत या परिसरात भुयारी गटार योजना राबवावी यासाठी प्रयत्नशील आहेत. गतवेळचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या काळातही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. तसेच मंडई परिसरात भुयारी गटार योजना का अंमलात आली नाही, याचा खुलासा अधिकाऱ्यांनी द्यावा अशी वाटेगांवकर यांनी लेखी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीसही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नाही.
नुकत्याच झालेल्या मासिक सभेत पुन्हा एकदा वाटेगांवकर यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला असता उपअभियंता पवार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच याबाबतचा अहवाल नगराध्यक्षांकडे दिला आहे असे सांगितले. त्यावर वाटेगावकर यांनी अहवाल मिळावा अशी मागणी केली. परंतु सभा होवून पाच दिवस झाले तरी त्यांना संबंधित विभागाकडून अहवाल मिळालेला नाही. कराडच्या वाढीव भागात सध्या भुयारी गटार योजना राबविली जात आहे. या विभागात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना जुन्या शहरातील लोकांचा यात समावेश केला जात नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)