भुगावमधील बाह्यवळणाचा प्रश्न मार्गी लावा

पिरंगुट – ताम्हीणी-कोलाड महामार्ग तसेच भूगावमधील बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आदर्श ग्रामपंचायत भूगावच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्याची मागणी नगरसेविका अल्पना वर्पे, भुगावचे सरपंच सचिन मिरघे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गावडे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय सातपुते, बोतरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार यांनी केली. मुळशीतून जाणारी कोकणवाहिनी म्हणजे पुणे-कोलाड रस्ता भूगाव दरम्यान कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. या भागात रोजची कोंडी हमखास ठरलेली आहे. मुळशीतील बरेचसे नागरीक काम-धंद्यांसाठी येत-जात असल्याने दररोज सुमारे 10 हजार वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. या भागात मंगल कार्यालयांची संख्या अधिक असल्याने या संख्येत वाढ होते. रस्ता लहान असल्याने पीएमटी, एसटी तसेच अन्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांना घेण्यासाठी थेट रस्त्यावरच उभी राहतात. राम नदीपासून भूगाव तलावापर्यंत वाहतूक ठप्प होऊन सुमारे दीड ते 2 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा नेहमीच लागतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सर्वांकडूनच केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)