भुकूमला प्लॉटींगमध्ये कोट्यवधींचा गंडा

पौड पोलिसांत डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल; आठ जणांची लूट

पुणे – भुकूम (ता.मुळशी) येथील जमिनी खरेदी-विक्री व्यवहारात 8 जणांची एकूण 1 कोटी 16 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून मुळशी तालुक्‍यातील जमीन खरेदी-विक्रीत होणाऱ्या फसवणुकीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. पूर्वी अनेक वेळा अशी प्रकरणे तडजोडीमध्ये मिटवली जात होती. परंतु, सदर प्रकरणी संबंधितांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी थेट संपर्क साधल्यानंतर भुकूम प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातून तालुक्‍यातील आणखी काही प्रकरणे उघडकीस येवू शकतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुकूम येथील जमिनीचे प्लॉटींग करून त्यामध्ये जागा शिल्लक नसतानाही एकूण 8 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डॉ. अभिजती हिंदुराव मोरे यांनी डेव्हलपर्स सह्याद्री लॅंडमार्कचे अमित सत्यप्पा गाडेकर, श्रीशैल तुकाराम गाडेकर यांच्या विरोधात आज (दि.22) फिर्याद दिली असून या दोघांनी विजया यादवराव पाटील, प्रेरणा यादवराव पाटील यांची 45 लाख रूपये, अंशुुमा अशुतोष गोखले यांची 25 लाख रूपये तसेच अनिकेत सुरेश शहाणे, सागर विनोद कपिले, बाहुबली धन्यकुमार भोरे, अभिनंदन धन्यकुमार भोरे यांचे 46 लाख 50 हजार रूपये अशी एकूण 1 कोटी 16 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

भुकूम येथील जमीन गट नंबर 124 मध्ये 146 आर क्षेत्रात सह्याद्री लॅंडमार्क नावे अमित सत्यप्पा गाडेकर, श्रीशैल तुकाराम गाडेकर यांनी प्लॉटींग केले. यामध्ये जागा शिल्लक नसतानाही 29.3 आर क्षेत्राची संबंधितांना बेकायदेशीरपणे विक्री केली. याकरिता संबंधित 8 जणांकडून गाडेकर यांनी रक्कम घेतली परंतु, जागेचा ताबा दिला नाही. हे व्यवहार दि. जुलै 2012 ते दि. 10 डिसेंबर 2013 या कालावधीत करण्यात आले आहेत. सदर, जागांचे खरेदी करताना पुणे-पौड या मुख्य रस्त्यापासून जमीन गट नंबर 119 मधून गट नंबर 124 मधील सर्व प्लॉटमध्ये जाण्याकरिता रस्ताही देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, याकामी डेव्हलपर्स गाडेकर यांनी गेली तीन ते चार वर्षे संबंधितांना खरेदी प्लॉटचा ताबा दिलेला नाही, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याबाबत फसणूक झालेले संबंधित पोलिसांकडे सातत्याने तक्रार करीत होते. गेली काही वर्षे याबाबत पाठपुरावा केला जात होता. परंतु, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. यामुळे फिर्यादीसह संबंधीतांनी याबाबत थेट पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली होती. यामुळे या प्रकरणात खुद्द पोलीस अधीक्षक पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून पौड पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या, त्यानंतर या प्रकरणी कारवाईची सूत्रे हलली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पौडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस हवालदार संजय राक्षे, पोलीस नाईक शंकर नवले, संजय सुपे, सुर्यकांत कुलकर्णी करीत आहेत.

जिल्ह्यात कोठेही अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लॉटच्या व्यवहारांत जागा मालकांची तक्रार आली तर जमीन मालकासह एजंटांवरही कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.
– संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)