भुईंजमधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

भुईंज, दि. 1 (वार्ताहर)- भुईंज येथील एका विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत असलेली मुलगी शनिवार, 29 रोजीपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना भुईंज येथील राहुल प्रकाश कुचेकर या तरुणाच्या घरात बेपत्ता मुलाचा शाळेचा गणवेश आणि दफ्तर आढळून आले आहे.
भुईंज येथील विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला वडिलांनी शनिवारी सकाळी शाळेत सोडले होते. शनिवारी असल्याने शाळा 11 वाजताच सुटली. मात्र शनिवारी संध्याकाळपर्यंत ही मुलगी घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांसह घरातील सर्वांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. अखेर रविवारी तिच्या वडिलांनी भुईंज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारी नोंदवली. तक्रार दाखल झाल्यानंतर पीएसआय दुर्गानाथ साळी यांनी तपासाची चक्रे गतिमान करत बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान, पोलिसांनी भुईंज येथील राहुल प्रकाश कुचेकर या तरुणाच्या घरावर छापा टाकला असता याठिकाणी पोलिसांना बेपत्ता मुलीचा गणवेश आणि दफ्तर आढळून आले. पोलिसांनी घराचा पंचनामा केला असून राहुल कुचेकर या तरुणाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)