भीषण अपघातात पोलिसासह युवक ठार

वाकेश्‍वर येथे दुचाकींची समोरासमोर धडक
वडूज, दि. 13 (प्रतिनिधी) –
वडूज-पुसेगाव रस्त्यावरील वाकेश्‍वर फाटा येथे मंगळवारी रात्री झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात पोलीस युवकासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार अजित टकले (वय 25) व महादेव वायदंडे (वय 27) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दहिवडी पोलीस ठाण्यात हवालदारपदी कार्यरत असलेले अजित उत्तम टकले (रा. निरा, फलटण) आपल्या दुचाकीवरुन डिव्हिजन टपाल देण्यासाठी वडूजला निघाले होते. ते वडूज-पुसेगाव दरम्यान असलेल्या वाकेश्‍वर फाटा येथे आले असताना त्यांची दुचाकीवरुन आलेल्या महादेव वायदंडे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, खटाव) यांच्या दुचाकीला समोरासमोरच धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे या दोघांचा गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला. दरम्यान, वायदंडे यांच्या दुचाकीवर असलेले यशवंत साठे (रा. अक्कलकोट) व प्रतिक दिलीप वायदंडे (रा. खटाव) हे दोघेही या अपघात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)