भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक मार्गावरील घटना, एसटी बसची ट्रकला धडक, 16 जण जखमी

एसटी चालकाची चूक ठरली अपघाताला कारणीभूत
नारायणगाव येथे घडली घटना

नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव (ता. जुन्नर) येथे रस्त्यात टायर बदलण्यासाठी उभा असणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव येणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पिंपरी चिंचवड, नारायणगाव, आळेफाटा, मंचर व नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत एस.टी. बसचालक संतोष यशवंत गुलदगड (वय 32, रा. पळशी, ता. बारामती) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिलेली माहिती अशी की, त्र्यंबकेश्‍वर -पुणे ही एसटी बस (एमएच 14 बीटी 4351) त्र्यंबकेश्‍वर येथून रविवारी (दि. 27) रात्री 9 वाजता पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री 1 च्या सुमारास नारायणगावजवळील मुक्‍ताई ढाब्याजवळ नारायणगावच्या दिशेने कांद्याने भरलेला आयशर टेम्पो (एमएच 17 टी 4199) हा रस्त्यात टायर बदलण्यासाठी उभा होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या एसटी बसने आयशरला जोरात धडक दिली. त्यामुळे एसटी बसमधील 27 प्रवाशांपैकी 9 जण जागीच मृत्युमुखी पडले. तर आयशर ट्रकचालक किशोर यशवंत जोंधळे (वय 40, रा. कोकणगाव, ता. संगमनेर, जि. नगर) आणि मदतीसाठी उभा असणारा दुसऱ्या आयशरचा चालक जाकीर ऊर्फ रशिद गुलाब पठाण (वय 30, रा. राजापूर, ता. संगमनेर, जि. नगर) हे दोघे ही मृत्युमुखी पडले.

एसटीमधील मृत प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे -शोभा नंदू पगार (वय 45, रा. उतराणे, ता. बागलाण, जि. नाशिक), यमुना भिल्ला पगार (वय 55, रा. उतराणे, ता. बागलाण (सटाणा, जि. नाशिक), विकास चंद्रकांत गुजराथी (वय 50, रा. गंगावेस सिन्नर, नाशिक), सागर ऊर्फ सौरभ कृष्णा चौधरी (वय 27, रा. चाळीसगाव, जि. जळगाव), अभिकेत गिरीश जोशी (वय 23, मूळ रा. ओझर नाशिक, सध्या रा. साईनाथ नगर, वडगावशेरी पुणे), संजवनी सूर्यकांत घाडगे (वय 45, रा. सिडको, नाशिक) व विनय भास्कर खैरनार (वय 30, रा. सटाणा नाशिक) अशी नावे आहेत.

मृत जोंधळेच्या मदतीला आला होता पठाण
आयशर टेम्पोचालक किशोर यशवंत जोंधळे आणि जाकीर ऊर्फ रशिद गुलाब पठाण हे दोघे दोन ट्रकमध्ये पुण्याला कांद्याची पोती घेऊन निघाले होते. त्यावेळी जोंधळेच्या ट्रकचा टायर फुटल्याने तो बदलण्यासाठी पठाण हा मदतीला आला होता. पण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. जोंधळेच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. तर पठाणच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे –

संतोष जयसिंग गुलदगड (रा. पळशी, बारामती), दीपक चंद्रकांत लांडगे (वारूळवाडी, नारायणगाव), संजीव तुकाराम भावसार (पुणे, सांगवी), तुकाराम जगल्या पवार (रा. आकुर्डी, वाल्हेकरवाडी), सूर्यकांत धोंडीराम घाडगे (रा. नाशिक), गणेश एकनाथ घोंगडे (रा. भोसरी, पुणे), सखुबाई शिवमन कपडणीस (रा. सटाणा, नाशिक), रमेश रामदास शेळके (रा. भोसरी, पुणे), ज्ञानेश्वर रमेश शेळके (भोसरी), अरुण लक्ष्मण शिंदे (संगमनेर, जि. नगर), सुधीर तीलक भगवाते (रा. तळेगाव दाभाडे, पुणे), तुषार दशरथ करळे (सटाणा नाशिक), प्रवीण रामसेवक दुबे (रा. शिवाजीनगर, पुणे).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)