भीषण…अग्नीतांडवात 75 झोपड्या खाक

नागरिकांचा आक्रोश
आंबेडकरनगर झोपडपट्टीत सुमारे चारशे ते पाचशे झोपडपट्ट्या आहेत. मजुरी आणि टेम्पो चालक, पथारीवाले यांचा समावेश असलेला हा भाग आहे. हातावरचे पोट असलेले हे नागरिक या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. पै पै गोळा करून जमविलेली पुंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बाधितांचा आक्रोश सुरू होता. हे विदारक दृश्‍य पाहून मदतीसाठी आलेल्या नागरिकांचे काळीज पिळवटून गेले.

मार्केट यार्ड येथील घटना : तीन सिलिंडरचे स्फोट

मार्केट यार्ड – मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागून 75 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत तीन सिलिंडरचे भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात आगीचे लोट पसरले होते. या आगीत अनेकांचे संसारपयोगी साहित्यांचे तसेच जमविलेली पुंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमुळे सुमारे दोनशेजणांचे कुटुंब उघड्यावर आले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. या परिसरात एकाच विद्युत पोलवरून अनेकांनी वीज कनेक्‍शन घेतल्यामुळे शॉकसर्किटमुळे आग लागल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

झोपडपट्टी भागात एकाच विद्युत पोलवरून अनेक वीज कनेक्‍शन घेतले जातात. पत्र्याची घरे असल्याने उन्हाळ्यात आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण जास्त आहे. आंबेडकरनगरमध्ये रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आतमध्ये येण्यास जागा नसल्याने आग विझविण्यास उशीर झाला. स्थानिक नागरिकांनी मदत करून आग विझविण्यास मदत केली.-डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्‍त, स्वारगेट पोलीस.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगर झोपडपट्टीत सुमारे चारशे ते पाचशे झोपडपट्या आहेत. त्यातच दाटावाटीचे रस्ते आहेत. वीज कनेक्‍शनसाठी परिसरातील नागरिकांनी एकाच खांबावरून वीज कनेक्‍शन घेतला आहे. उन्हाळ्याची तीव्रता असल्याने खेळती हवा नसल्यामुळे या विद्युत पोलवर अतिरिक्‍त ताण आल्यामुळे शॉर्टसर्किटची घटना असल्याची शक्‍यता नागरिकांनी वर्तविली जात आहे. शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता आंबेडकरनगर झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी, कर्मचारी बारा बंब आणि पाण्याचे टॅंकर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे व इतर 200 कर्मचारी, नागरिकांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र, आग आटोक्‍यात येत नव्हती. झोपड्यांची संख्या जादा असल्याने आगीत एक एक झोपड्या भक्ष्यस्थानी पडत होत्या. त्यामुळे अग्निशमन जवानांना आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी तसेच तरूणांनी शेजारच्या इमारतीवर जाऊन साहित्य बाहेर काढण्याचे काम केले. झोपड्या आगीत लपेटून जात असताना त्यातच तीन सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. त्यामुळे आग विझविण्यात अडचणी आल्या. सिलेंडरच्या स्फोटामुळे पुन्हा आग भडकली. त्यामुळे जळीत झोपड्यांची संख्या 75 वर गेली. दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आंबेडकर झोपडपट्टी भागात दाट वस्ती व अरूंद रस्ते आहे. त्यात झोपड्या एकमेंकाला खेटून असल्यामुळे मदतकार्य करण्यास अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक युवक व पोलिसांनी जीव धोक्‍यात घालत शेजारील घरांच्या पत्र्यांवर चढून आग विझवण्यासाठी पाण्याचा जोरदार मारा केला. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.

या घटनेची माहिती समजताच महापौर मुक्‍ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी स्वारगेट पोलीस सहाय्यक आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार, मार्केट यार्ड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग नियंत्रणात आणताना पोलीस सहाय्यक आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता आगीच्या तोंडातून अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्‍त अविनाश सपकाळ म्हणाले की, बाधितांना मार्केट यार्ड येथे आंबा महोत्सव जागेत तात्पुरती राहण्याची सोय करून दिली आहे. बाधित घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यांना महानगरपालिकेकडून योग्य मदत केली जाईल.

सामाजिक कार्यकर्ते शतायु भगळे म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केले. जळीत झोपड्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन बंब आणि रूग्णवाहिकेला रस्ता करून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)