भीमेला पूर; मात्र घोडनदी कोरडी

मांडवगण फराटा – पावसाळा सुरु होऊन दोन एक महिना झाला तरी शिरूरच्या पूर्व भागातील अनेक गावांत दुष्काळाचे चित्र अजूनही पाहायला मिळत आहे. शिरुर तालुक्‍याला दोन नद्याची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी भीमा नदी गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याने खळखळून वाहत असताना घोडनदीचे पात्र मात्र कोरडे ठणठणीत पडले आहे.

शिरूरच्या पूर्व भागातील बहुतांशी शेतकऱ्यांची शेतीही घोड व भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असते; परंतु घोड नदीचे पात्र हे गेल्या चार महिन्यांपासून मोकळे असून नदीमध्ये ठराविक पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांची पिके जळून गेली होती. भीमा नदीला बारमाही पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिके घेतली होती; मात्र ऊस जळून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी ती गुऱ्हाळ व चारा छावण्यांना दिला होता. आता मात्र पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असताना घोडनदी मात्र मोकळी दिसत आहे.

तांदळी, शिरसगाव काटा, नलगेमळा, इनामगाव, चिंचणी व शिरुर तालुक्‍यातील गावांसह श्रीगोंदा तालुक्‍यातील गावे या घोड नदीपात्रातील पाण्याच्या जीवावर अवलंबून आहेत. पण सतत पाण्याच्या कमतरतेमुळे या भागांमध्ये दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोड नदीवर छोटे -मोठे बंधारे बांधले आहेत; परंतु या बंधाऱ्याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष असल्यामुळे या बंधाऱ्याची वाट लागून पाण्याचे नियोजन कोलमडत आहे. सध्या या भागामध्ये घोड नदीपात्रामध्ये पाणी नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच पाणी नसल्याने या भागातील ऊस लागवडीसह इतर नगदी पिकांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)