भीमा नदीतील वाळू चोरी करणाऱ्या दोघांना मोक्का न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे – बेकायदेशीरपणे भीमा नदीतील वाळूंची चोरी करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्या दोघांना 22 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी दिला आहे. या प्रकरणात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली आहे. तो पोलीस कोठडीत आहे. टोळीप्रमुखासह दहा जण अद्याप फरार आहेत.
राहुल रामेश्‍वर सरवळे (वय 27) आणि समाधान भारत सरवळे (वय 21, दोघेही, रा. बेगमपूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पृथ्वीराज तात्यासो भोसले (वय 27, रा. बेगमपूर, ता. मंगळवेढा) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर टोळीप्रमुख रविंद्र ऊर्फ पपल्या रामा ऊर्फ रमेश काळे, सचिन सुरेश काळे, सुरेश ऊर्फ बिगुल्या रामा ऊर्फ रमेश काळे, किशोर रामा काळे, अमित शरण्णाप्पा भोसले, शंकु ऊर्फ शंकर सुरेश काळे, संजय शरण्णाप्पा भोसले, सुरज शरण्णाप्पा भोसले, विक्‍या भिमसिंग भोसले (सर्वजण, रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) आणि शरद जाफर पवार (रा. सिध्दापूर, ता. मंगळवेढा) हे दहा जण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना 23 एप्रिल रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास मंगळवेढा तालुक्‍यातील तांडोर गावच्या हद्दीत घडली. याबाबत सोलापूर ग्रामीण विशेष पथकाचे पोलीस हवलदार सुरेश लामजने यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पोलिसांना अवैधरित्या वाळूची चोरी करताना आढळले. त्यावेळी फिर्यादी आणि इतर पोलीस स्टाफला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी दांडपट्टा चालविला. ट्रॅक्‍टर अंगावर घातला. पोलिसांनी पकडलेली विना क्रमांकाची ट्रक पळवून नेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करून मंगळवेढा पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी टोळीप्रमुख रविंद्र याच्यासह फरार असलेल्या सराईत दहा जणांच्या शोधासाठी, गुन्ह्यात वापरलेला लोखंडी दांडपट्टा, ट्रॅक्‍टर, विना क्रमांकाची ट्रक जप्त करण्यासाठी, वाळू तस्करीतून मिळविलेला पैसा कोठे गुंतविला आहे. याच्या शोधासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)