भीमाशंकर विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही

मंचर- भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही,याची दक्षता घेतली जाणार असून, आराखड्यामध्ये ज्यांच्या दुकानांच्या नोंदी आहेत, त्या सर्वांना पक्की दुकाने बांधून मिळणार आहेत, अशी ग्वाही सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आयोजित केलेल्या श्रावण यात्रेच्या नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हा अधिकारी आयुश प्रसाद बोलत होते. यावेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक मारुती लोहकरे, उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, उपाध्यक्ष विकास ढगे, विश्‍वस्त पुरुषोत्तम गवांदे, मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, उपअभियंता एल. टी. डाके, दत्तात्रय कौदरे, दत्ता लोहकरे, वनपरीक्षेत्र अधिकारी डी. आर. झगडे, श्री लांघी, सरपंच दीपक चिमटे उपस्थित होते.
भीमाशंकर आराखड्यामध्ये कुणाचीही खासगी जागा संपादित केली जाणार नसून अनधिकृत दुकानदारांनी शासकीय मदतीची अपेक्षा ठेवूनये. परिसरात सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यवसायिकांकडे प्लॅस्टिक सापडल्यास कारवाई करण्यात येईल. सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात्राकाळात नेमुन दिलेल्या कामात दिरंगाई केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
रस्ता विकास योजनेतून स्थापन झालेली ग्रामविकास समिती आणि वन्यजीव विभागाने पार्किंग ते मंदिरापर्यंत दिवसातून एक वेळा कचरा जमा करून विल्हेवाट लावावी. यात्रा काळात भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी पोलीस प्रशासन आणि देवस्थान यांनी प्रयत्न करावे. यात्रा काळात भीमाशंकर परीसरात लाईट जाणार नाही, याची काळजी विद्युत वितरण कंपनीने घ्यावी. आरोग्य विभागाकडून पोखरी घाट, तळेघर आणि भीमाशंकर येथे रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. एसटीकडून देण्यात येणाऱ्या मिनी बसेस मिळणार नसल्याने खासगी मिनी बसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. शनिवार, रविवार आणि सोमवार यात्रा काळात दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोखरी घाटापासून तीन ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात करण्यात येणार असून, दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची ब्रीथ एन्लायझर मशीनद्वारे दारू घेतली किंवा नाही, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)