भीमाशंकर रस्त्याची दयनीय अवस्था

तळेघर- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होणार असून मंचर-भीमाशंकर महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे तर साईडपट्टया खचल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, श्रावण तोंडावर येऊनही गप्प असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
श्रावणमध्ये भीमाशंकर येथील शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. यावेळी मंचर-भीमाशंकर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. डिंभे गावापासून पुढे भीमाशंकरकडे जाताना सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुके यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशातच रस्त्यात पडलेले खड्डे व खचलेल्या साईड पट्ट्या यामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. सध्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. मंचर येथून रविवारी आठवडे बाजार असल्याने पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर केला जातो. मात्र, या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हा रस्ताच डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरून जात असल्याने याठिकाणी देखील अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डागडुजीचे काम त्वरित करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डाके यांच्याशी संपर्क साधला असता शासनाकडे दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक बनवून प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. श्रावण सुरू होण्यास अवघे सहा दिवस उरले असताना निधी मिळाला नसल्याने भाविक तसेच स्थानिक नागरिक नाराजी व्यक्‍त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)