पुणे – भीक मागण्यासाठी चिमुकल्याचे अपहरण

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचे कृत्य


पुरंदर येथील वीरच्या जत्रेतून केली अटक

पुणे – लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने भीक मागण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. मात्र, कोंढवा पोलिसांनी माग काढत या जोडप्याला अटक केली. बांधकामावर मजुरी काम करणाऱ्या जोडप्याचा हा मुलगा होता. दि.24 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 110 सीसीटीव्हींची बारकाईने तपासणी करत तीन दिवसानंतर मुलाची पुरंदर तालुक्‍यातील वीर येथील जत्रेतून सुटका केली आहे.

अविनाश आडे (वय-तीन वर्षे सहा महिने) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील गोविंद पांडुरंग आडे (26) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आरोपी लाला शिवाजी सूर्यवंशी (38, मूळ नंदगाव, ता.तुळजापूर) व सुनीता लक्ष्मण बिनावत (30, रा.उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही मजुरी करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अविनाश आडे हा दि. 24 रोजी कोंढवा येथील शालीमार सोसायटीजवळ आईसोबत गेला होता. तेथे त्याची आई सरपण शोधत होती. यावेळी खेळता-खेळता तो अचानक बेपत्ता झाला. याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर चौकशीदरम्यान पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खंडणीसाठी हा प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वेगवेगळ्या शक्‍यतांची पडताळणी केली असता, मुलाचे अपहरण भीक मागण्यासाठी झाले असावे, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.

दरम्यान, कोंढवा, मार्केटयार्ड, स्वारगेट, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, कॅम्प, वानवडी, हडपसर, पुणे रेल्वे स्टेशन असा आजुबाजूच्या सर्व परिसर पोलिसांजी पिंजून काढत या मार्गावरील तब्बल 110 सीसीटीव्हींची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी एका ठिकाणी एक महिला व पुरुष एका लहान मुलाला नेत असल्याचे दिसले. परंतु त्यांची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी चिकाटीने तपास करत आरोपींची ओळख पटवली. त्यामुळे तपासाला वेग आला. यानंतर दोघे संशयित हे बांधकाम मजूर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मुलास काळेवाडी-जगताप चौक येथे दोन दिवस आणि तेथून सासवड येथे नेले. पुरंदर तालुक्‍यातील श्रीनाथ म्हसोबा देवाची यात्रा सुरू असल्याने त्याठिकाणी लाखो भाविकांची गर्दी होती. त्याठिकाणी मुलास भीक मागण्यासाठी आरोपी घेऊन गेले होते. पोलिसांनी जत्रेत रात्रभर “सर्च ऑपरेशन’ राबवत शोध घेतला. सकाळी सव्वाआठच्या सुमारास एका लहान मुलास कापडात गुंडाळून झोपडीचे बाजूला झुडुपात संशयित आरोपी लपून बसलेले दिसताच सापळा रचून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

याबद्दल परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

भीक मागुन स्वत:चा उदरनिर्वाह आरोपी करत होते. भीक मागतेवेळी लहान बाळ जवळ असल्यास जास्त भीक मिळते. त्यामुळे त्यांनी या बालकाचे अपहरण भीक मागण्याचे हेतूने केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
– महादेव कुंभार, पोलीस निरीक्षक, कोंढवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)