भीक मागण्यासाठी चिमुकल्याचे अपहरण

महिला जेरबंद : मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरातून घेतले ताब्यात

पुणे स्टेशन परिसरातील चौथी घटना

-Ads-

पुणे – भीक मागण्यासाठी चार महिन्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस पुणे लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरातून ताब्यात घेतले आणि मुलाची सुखरूप सुटका केली. लहान मूल जवळ असल्यास जास्त भीक मिळेल, या आशेने तिने मुलाचे अपहरण केले होते. हे मूल पुणे रेल्वे स्टेशन येथून दि. 17 ऑगस्टच्या रात्री झोपत असलेल्या महिलेजवळून पळवून नेण्यात आले होते. रेल्वे स्थानक परिसरातील मागील वर्षभरातील ही चौथी घटना आहे.

याप्रकरणी मनीषा महेश काळे (25, रा. हडपसर रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी, मूळ भिंगार देवमळा, जि. अहमदनगर) या महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील संगीता आनंद कंद (25, रा.मूळ कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) ही महिला पंधरा दिवसांपूर्वी कामाच्या शोधात पुणे शहरात आली होती. तिच्या पतीचे निधन झाले आहे. मात्र, कोठेही काम मिळत नसल्याने ती दिवसभर भीक मागून रात्री पुणे रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान, दि. 17 ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्र. 2 वरील बुक स्टॉलजवळ मुलासह झोपलेली असताना तिचा चार महिन्यांचा मुलगा प्रमोद यास पळवून नेण्यात आले होते. शोध सर्वत्र शोध घेऊनही तो सापडून न आल्याने तिने लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी फिर्याद दिली होती.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लोहमार्ग पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशन आणि परिसरातील रस्त्यावरील सीसीटीव्हींची चित्रफीत तपासली. त्यामध्ये एका भिकारी महिलेने त्याला उचलून नेल्याचे अस्पष्ट चित्र दिसून आले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. पुणे शहरातील विविध धार्मिक स्थळे, उद्याने, मंडई परिसरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, मूल पळवून नेणारी महिला सापडली नाही. पोलिसांनी मुंबईसह इतर लोहमार्ग पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. आरोपी महिला मुलास मुंबई येथे भीक मागण्यासाठी घेऊन गेली होती आणि ती जोगेश्‍वरी परिसरात एका रेल्वे पुलाखाली राहत होती. एका भिकारी महिलेला संशय आल्याने तिने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून आरोपी महिला मनीषा काळे आणि मुलास ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहायक निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस कर्मचारी अनिल दुगाने, सुनील कदम, श्रीकांत भोसले, आनंद कांबळे, अमरदिप साळुंके, अनिल दांगट, दिनेश बोरनारे, जनार्दन गर्जे, अश्‍विनी येवले, मनीषा बेरड यांच्यासह ओशिवरा पोलीस ठाणे आणि अंबोली पोलीस ठाणे मुंबई शहर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

…बाळाच्या रडण्यामुळे आला संशय
बकरी ईदनिमित्त मुंबईत गोरगरिबांमध्ये मटण वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मनीषा काळे ही लहान मुलास घेवून मटण घेण्यास गेली. तेव्हा, तिच्याकडील मूल जोरजोरात रडत होते आणि काही केले तरी ते रडणे थांबवत नव्हते. त्यामुळे एका महिलेस संशय आला तिने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर महिलेसह मुलास ताब्यात घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)