स्ट्रॉबेरी पिकाचे लाखोंचे नुकसान
पाचगणी – भिलार गाव हे स्ट्रॉबेरी पिकाचे माहेरघर. या गावात अंदाजे 10 लाखाहुन अधिक स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली जाते. परंतु, या भागात वन्यप्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे. या वन्यप्राण्यांपासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
भिलार (ता. महाबळेश्वर) येथे रामनगर नावाच्या शिवारात रान गव्यानी सुभाष किसन भिलारे या शेतकऱ्याच्या शेतात 10 ते 15 हजार स्ट्रॉबेरी रोपांचे नुकसान केले. या रान गव्यानी हातातोंडाला आलेले स्ट्रॉबेरीचा सुपडासाप केल्याने शेतकरी हवालदीप झाला आहे.
या शेतकऱ्याला वर्षाकाठी दोन ते तीन लाख उत्पादन मिळाले असते. पण या गव्यानी हाता तोंडाशी आलेले पिकाचे नुकसान केल्याने या शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पिकाची पाहणी वनविभागाने करून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान भरपाई द्यावी व या रानगव्या, सांबर व वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व शेतकरी वर्ग करत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा