भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही – मुख्यमंत्री

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण
चिथावणीखोरांवर होणार कठोर कारवाई

मुंबई – भीमा-कोरेगाव दंगलीत संभाजी भिडेगुरूजी वा त्यांचे सहकारी यांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सापडलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. मात्र, या दंगलीला जे कोणी जबाबदार आहेत, अगदी माझ्या घरच्या व्यक्‍तीचाही सहभाग असला तरी त्याला सोडणार नाही. एवढेच नव्हे तर दंगलीला चिथावणी दिल्याचे आढळून आले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
विधानसभेत नियम 293 अन्वये आणलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी भीमा-कोरेगाव दंगलीला जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडेंना अटक का केली जात नाही, यावरून सरकारवर टिकेची झोड उठवली होती. या टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण केले.

भीमा-कोरेगाव दंगल हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असे सांगतानाच मिलिंद एकबोटेना अटक करण्यास राज्य सरकार उत्सुक नव्हते हा आरोप खोडून काढत एकबोटेना जामीन मिळू नये यासाठी राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयातही त्यांची कोठडी मिळावी यासाठी देशाच्या ऍटर्नी जनरलच्या माध्यमातून राज्य सरकारने बाजू मांडल्याचे त्यांनी सांगितले.

भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी एकही पुरावा हा संभाजी भिडे वा त्यांचे सहकारी यांचा हात असल्याचे दर्शवित नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्या मोबाईलचे गेल्या सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासले आहेत. ते या कालावधीत या भागात गेलेलेही नाहीत वा त्यांनी त्यासंदर्भाने कोणाशीही बोलणेही केलेले नाही. केवळ या घटनेतील एका महिलेले केलेल्या तक्रारीत त्यांचे नाव घेतले आहे.

मात्र या महिलेचीही इनकॅमेरा विचारणा केली असता तिने सांगितले की, संभाजी भिडे यांना आपण तिथे प्रत्यक्ष पाहिलेले नाही. फक्‍त त्यांच्या सहभागाची तिथली काही मंडळी चर्चा करत होती, ते मी ऐकले होते. संभाजी भिडे यांचा या प्रकरणाशी सहभाग दर्शविणारा एकही पुरावा उपलब्ध नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)