भिडे गुरुजींचा सत्कार उधळून लावणार

आळंदी पोलिसांना दलित संघटनांचा निवेदनाद्वारे इशारा

आळंदी- राष्ट्रीय वारकरी सेना व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आळंदीत आयोजित केलेल्या चौदाव्या राज्यव्यापी वारकरी महाधिवेशनात येत्या मंगळवारी (दि. 4) संभाजी भिडे गुरुजींचा सत्कार केला जाणार आहे. या सत्कार सोहळ्याला दलित संघटनांनी विरोध केला आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा देखील इशारा दिला आह. कार्तिकी यात्रेनिमित्त अलंकापुरीत दाखल झालेल्या भाविकांची लाखोंची संख्या लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय वारकरी सेना व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आळंदीतील गोपाळपुरा येथील श्री देविदास धर्मशाळेत मंगळवारी भिडे गुरुजींचा सत्कार केला जाणार आहे. भीमा कोरेगाव दंगलीला एक वर्ष होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. कोरेगाव भीमापासून काही अंतरावर असलेल्या आळंदीत हा कार्यक्रम होत असल्याने पोलीस प्रशासन कमालीची सतर्कता बाळगून आहे.
या सत्काराच्या पार्श्‍वभूमीवर भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशन, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ यांसह अनेक संघटनांनी आळंदी पोलीसांना निवेदन दिले आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त राज्य-परराज्यातून आळंदीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. कोरगाव भीमा दंगलीची आयोगामार्फत सुनावणी सुरु आहे. अशातच संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महारारांपेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे वक्‍तव्य करुन भिडे गुरुजींनी वारकरी सांप्रदायाचादेखील रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे काही वारकरी संघटनांचादेखील या सत्काराला विरोध होण्याची शक्‍यता आहे.
दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत असलटवार, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रव्रिंद चौधर यांची भेट घेत, दलित संघटनांची भूमिका स्पष्ट केली. वारकरी महाअधिवेशनला आमचा विरोध नाही. मात्र, भिडे गुरुजींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आमचा विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी, अन्यथा हा कार्यक्रम आम्ही उधळून लावू. त्यामुळे कार्तिकी यात्रेत निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाला आयोजक संस्था व पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल, असे या निवेदनात नमूद केले आहे. या शिष्टमंडळात ऍड. जितेंद्र कांबळे, प्रा. बबन लोंढे, हरिष डोळस, अश्‍विनी कांबळे, वंदना सोनवणे, रोशन गडलिंग, राहूल इनकर यांचा समावेश होता.

  • सहायक आयुक्‍त-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
    भिडे गुरुजी यांच्या नियोजित कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचे निवेदन सादर करण्यासाठी निळे झेंडे घेऊन आलेले कार्यकर्ते पाहून चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत असलटवार चांगलेच संतापले. अशी पद्धत असते का निवेदन देण्याची ? अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना विचारणा केली. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्याबाबतची पद्धत समजावून सांगण्याची विनंती केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
16 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)