भिगवणचे नवे मासळी मार्केट धूळखात

डिकसळ– उजनी धरण गोड्या पाण्यातील मासेमारीकरिता प्रसिद्ध आहे. मोठी बाजारपेठ आणि पुणे, नगर, सोलापूर जिल्हाच्या सीमेवर, अशी ख्याती असलेल्या तक्रारवाडी हद्दीतील जुन्या मच्छी मार्केटमध्ये असुविधांची वानवा आहे. मासेमार, आडतदार, कामगार यांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. तर राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून नवी मासळी मार्केट बारामती-नगर रस्त्यालगत उभारलेले नवे मासळी मार्केट दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे.
भिगवणच्या तक्रारवाडीतील गेली कित्येक वर्षे मासळी बाजारामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मासे खरेदी-विक्रीसाठी मोठ-मोठे व्यापारी येथे येत असतात. सध्या, येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून शौचालय, मुतारी अभावी साचलेल्या गटारींतील दुर्गंधी येथे सुटते. पिण्याच्या पाण्याची आणि पार्किंगचीही व्यवस्था नाही. मार्केटमध्ये छत नसल्याने पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांची तारांबळ उडते. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नसल्याची खंत मासेमार, व्यापारी, आडतदार व्यक्त करीत असून मच्छी मार्केट नव्या मार्केटमध्ये लवकरात लवकर स्थलांतरीत करावे, अशी मागण होत आहे. परंतु, केवळ राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यात समन्वय होत नसल्याने नव्या ठिकाणी हे मार्केट कधी जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उजनीतील मासेमारीचा ठेका 2008 मध्ये तत्कालीन युती सरकारने उजनी पाणलोट क्षेत्रातील मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून काढून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून मासेमारांना मासिक 500 रुपयांचा परवाना पास देवून मासेमारीला परवानगी दिली जाते. या परवान्यात देखील दुजाभाव केला जात असल्याचा आरोप मासेमार करीत आहेत. यामुळे उजनीतील मच्छीमारांचा रोजगार हिरावला गेला असून मासेमारीचा हक्क अद्यापही भाजपा सरकारच्या काळात देखील लालफितीतच अडकला आहे. सध्या, सुरु असलेले मार्केटचे स्थलांतर लवकर करून होत असलेली गैरसोय रोखावी, अशी माफक अपेक्षा मासेमार, आडतदार आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

  • नवीन मार्केट कमिटीच्या जागेतील मासळी मार्केटमध्ये मासे व्यापाऱ्यांना पुरेसे गाळे उपलब्ध नसल्याने या ठिकाणी गाळे वाढविल्यास नवीन मासळी बाजारात सुविधा मिळतील.
    – सिताराम नगरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समिती
  • सध्या सुरु असलेल्या जुन्या मार्केट मध्ये पिण्यासाठी कुठल्याही मुलभुत सुविधा नाहीत. गाड्यांसाठी पार्किग नसल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.
    – माउली नगरे, आडतदार/व्यापारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)