भिगवण- चिखलांशी खेळणारी मुले, चिमुकल्या हातांना गणेशाच्या मुर्तीला आकार देताना दाटलेले कुतुहल, सुंदर मूर्ती झाल्यानंतर चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद असे चित्र शनिवारी (दि. 8) भिगवण (ता. इंदापूर) येथील कला महाविद्यालयामध्ये रंगले होते. निमित्त होते नेचर फाउंडेशनच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शनकाच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या गणेश मुर्तीमुळे होणारे प्रदूषण तसेच गणेश मुर्तींच्या विसर्जनानंतर होत असलेली मुर्त्यांची विटबंना या सर्व बाबी टाळण्यासाठी येथील नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चौधरी, सदस्य डॉ. प्राची थोरात, डॉ. प्रशांत चवरे, रंजना आघाव, प्रा. शाम सातर्ले यांनी पुढाकार घेत मुलांना मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी बनविलेल्या गणेशमुर्तींतीची घरात प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्यामुळे मुलांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमाबरोबरच प्रदूषण कमी करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्‍त असल्यामुळे पालक वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कार्यशाळेमध्ये दीपक कुंभार व अनिसा तांबोळी या कलाशिक्षकांनी मुलांना मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले व त्याचे महत्त्व विषद केले. कार्यशाळेमध्ये भिगवण व परिसरातील मुलांनी सहभाग घेत मातीपासून सुरेख गणेश मूर्ती बनविल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)