भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे…

नीलिमा पवार

काही वाक्‍ये मोठी आश्‍वासक असतात. मनाला धीर देतात, उभारी देतात. असेच एक वाक्‍य आहे ” भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे….’ हे. हे वाक्‍य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. आणि ते दिसले की मनातील खंत, नाराजी, दु:ख सारे कमी होते, नाहीसे होत नाही, पण नक्‍कीच कमी होते. निदान त्या क्षणापुरते तरी. पण जर आपण सतत नामस्मरण करत राहिलो तर ते कायमचेही नाहीसे होईल. पण तसे होत नाही. कारण आपणच. आपले वढाळ वढाळ मन जरा फुरसत मिळाली की इकडेतिकडे भटकू लागते. सुखचैनीच्या मागे लागते आणि काही काळाने परत नाराज होते. असे हे चक्र आयुष्यभर चालूच राहते आणि असे चालू राहते म्हणून तर आपण सामान्य जीवन जगतो.

स्वामी समर्थ – अक्‍कलकोटचे……..एक अवतारी पुरुष. तसे ते दत्ताचेच अवतार समजले जातात. दिगंबर अवतार. पद्मासन, हाती एक मणी, तो कसला हे माहीत नाही. चेहरा युगायुगाच्या खुणा दाखवणारा. सारे काही पाहून झाले आहे, काही पाहायचे बाकी राहिलेले नाही असे दर्शवणारा. वृद्ध पण तेजस्वी, तेजाचे वलय असणारा.
भक्‍तजन त्यांना अनेक रूपांत दाखवतात. अगदी माऊलीच्या रूपातसुद्धा! पण त्यांचे नित्याचे रूप एकच. पद्मासनात बसलेले. रूप कोणतेही असले तरी प्रत्येक प्रतिमेखाली एकच एक वाक्‍य असते-भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे…..हे वाक्‍य मनातील भय, चिंता दूर करणारे आहे. माणसाला शेवटी काय हवे असते? सारे काही मिळाले तरी आपले कोणी आहे कधीही आपल्या हाकेला धावून येईल, पाठीवरून ममत्वाने हात फिरवील आणि म्हणेल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे…. आणि या एका वाक्‍याने संकटे-अडचणी-संकटांचा सामना करायला, लढायला दहा हत्तींचे बल येते अंगी.

स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्‍तजन आहेत. सर्वत्र पसरलेले. स्वामींच्या लीला आणि चमत्कार अनेक आहेत. पण खरा चमत्कार एकच. “”त्यांच्या प्रत्येक प्रतिमेखाली लिहिलेले वाक्‍य, “”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” याचा अर्थ एवढाच आहे, की तू पुढे हो. माझ्यावर विसंबून, अवलंबून राहू नकोस.तुझा मार्ग तूच चाल. मी काही तुला उचलून कडेवर घेणार नाही. तुझा हात पकडूनही तुला चालवणार नाही. मी तुझ्या मागे आहे. पडला झडलास तर मी तुला हात देईन. पण तू चालायला सुरुवात कर.

मला स्वत:ला या गोष्टीचा अनेकदा अनुभव आलेला आहे. एखादी अडचण आलेली असते. दूर होणार नाही असे वाटून मन निराश होऊ लागलेले असते. अशा वेळी समर्थांचे ध्यान केले ” स्वामी समर्था माझी आई-मजला ठाव द्यावा पायी’ असे म्हटले की धीर येतो. कोणतेही संकट कोणतीही अडचण कायम राहात नाही. पण ती असतानाचा काळ निभावून जाण्यासाठी ‘ भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे…’ असे कोणी तरी म्हणणारे हवे असते. कधी पाठचा भाऊही पाठीशी राहात नाही, अशा वेळी समर्थ राहतात, माणसाला समर्थ करतात. म्हणूनच त्यांनी स्वामी समर्थ हे नाव धारण केलेले असावे. माणसाला समर्थ करतात, मानसिक दृष्टीने कणखर करतात ते समर्थ-स्वामी समर्थ.

अगदी लहान बालकापासून ते मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, भित्र्यापासून तेरणगाजीपर्यंत, सामान्यजनांपासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येकाला कोणीतरी पाठीशी हवे असते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पाठीशी शाबासकीचा हात हवा असतो. खेऴाडूंना पाठीशी उत्साह देणारे चाहते हवे असतात, तरुणांच्या पाठीशी प्रेमाची नजर हवी असते, आणि वृद्धांना पाठीशी आधार हवा असतो, सीमेवर लढणाऱ्या जवानांना काळजी करणारे “” घास रोज अडतो ओठी…. सैनिक हो तुमच्यासाठी..असे ममत्वाने म्हणणारे “आपले’ पाठीशी हवे असतात. प्रजेला पाठीशी जाणता राजा हवा असतो, तर राजाला जिवाला जीव देणारी प्रजा पाठीशी हवी असते.,

हे न संपणारे चक्र आहे आणि यामुळे तर जग सुरळीतपणे चालले आहे, म्हणूनच स्वामींच्या दर्शनाचे-स्मरणचे महत्त्व.
कधीही नुसती स्वामी समर्थ ही अक्षरे पाहिली तरी लगेचच स्मरण होते, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि जीवन सुफल होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)