भाषा-भाषा : हिंदी-समज-गैरसमजांच्या पलीकडे…   

देविदास देशपांडे 

दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पाहा! आपल्या भाषेचा त्यांना किती अभिमान! हिंदी भाषा बिल्कुल बोलत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. मराठीच्या प्रचार-प्रसाराबाबत होणाऱ्या कुठल्याही चर्चेदरम्यान किंवा आंदोलनादरम्यान हटकून ऐकू येणारा हा संवाद. अर्थात 1960 च्या दशकादरम्यान तमिळनाडूत झालेले हिंदीविरोधी आंदोलन आणि उग्र विरोध याची जुजबी माहिती कोणाही भारतीयाला असतेच. शिवाय अशाच प्रकारच्या वाक्‍यांची वरचेवर सरबत्ती झाल्यामुळे मनात निर्माण झालेली प्रतिमाही असतेच. त्यामुळे खरोखरच दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदीला विरोध होतो, याबाबत कुणी शंका घेतही नाही.

हिंदीच्या विरोधाबाबत वस्तुस्थिती काय आहे? हिंदी सगळीकडेच वाढत आहे – भारतात आणि जगातही. दाक्षिणात्य राज्यही याला अपवाद नाहीत. तेलंगाणा राज्यात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हिंदीची वाढ झपाट्याने झाली आहे. त्यातच तेलुगू चित्रपट हिंदीत डब होण्याची संख्या अफाट गतीने वाढल्यामुळे हिंदीबद्दलचा परकेपणा किमान तेलंगण आणि आंध्र प्रदेशात राहिलेला नाही. केरळमध्ये पर्यटकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तेथेही हिंदीचा संचार बऱ्यापैकी झालेला आहे.

कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तेथेही हिंदीचा प्रसार झाला आहे. तमिळनाडूमध्येच सर्वात मोठे हिंदीविरोधी आंदोलन झाले होते. हिंदीला सर्वात प्रखर विरोध याच राज्यात होतो. त्यामुळे हिंदीला पाय पसरण्यासाठी किमान या राज्यात तरी ओसरी मिळणार नाही, असा अनेकांचा कयास होता. मात्र, जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 2001 आणि 2011 या दशकभरात तमिळनाडू राज्यात हिंदीचा बऱ्यापैकी प्रसार झाला आहे. तेथे हिंदी भाषिकांची संख्या 50 टक्क्‌यांनी वाढली आहे. हिंदी बोलू शकणाऱ्या दक्षिण भारतीयांची टक्केवारी या काळात केवळ 13 टक्क्‌यांनी वाढली आहे. त्या तुलनेत तमिळनाडूतील ही वाढ अचंबित करणारी आहे. राज्यात 1960 च्या दशकात झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनामुळे तमिळ-भाषकांच्या अनेक पिढ्यांनी हिंदीपासून हातभर अंतरावरच राहणे पसंत केले आहे. मात्र याच काळात देशाच्या उत्तर, ईशान्य आणि वायव्य भागातून आलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे तेथील लोकसंख्येची रचनाच बदलली आहे.

हिंदी बोलणारे तमिळभाषक लोक आजही संख्येने कमीच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाची आवड पाहता, हे विद्यार्थी द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून हिंदीची निवड करत आहेत. “तमिळनाडूच्या बाहेर नोकरी शोधत असलेले लोकही हिंदी शिकत आहेत’, अशी कारणे या वाढीच्या पाठीमागे देण्यात येतात.

तमिळ लोकांनी हिंदी शिकण्याची अनेक कारणे आहेत. स्थलांतर हे त्यातील एक आहे, पण टीव्ही कार्यक्रमांचाही मोठा परिणाम होतो. दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना हा बदल खऱ्या अर्थाने सुरू झाला, असे समाजशास्त्रज्ञाचे संशोधक डॉ. जी. एस. कारंथ यांचे म्हणणे आहे. अर्थात हिंदी बोलणारे सर्वच तमिळ लोक काही या भाषेतील जाणकार नाहीत. यातील बरेच लोक तमिळ, इंग्रजी आणि हिंदी यांचे मिश्रण असलेल्या भाषेत संवाद साधतात. परंतु उत्तरेतून आलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे हिंदी शिकणे म्हणजे बदललेल्या परिस्थितीत व्यक्तीच्या कमाईत वाढ करणे, असे निरीक्षणही कारंथ त्यांनी नोंदवले आहेत. हिंदी फक्त कामगारांमध्येच नव्हे कारखाने तसेच राज्य, केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्येही बोलली जाते. यातील अनेक कंपन्यांचे मालक उत्तर भारतीय आहेत, जे फक्त हिंदीच बोलतात. आपण हिंदी शिकत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये काम करणे कठीण होईल, असे तमिळ कामगारांना वाटते.

तमिळनाडू विधानसभेची 2016 सालची निवडणूक सुरू असताना मदुराई येथे प्रचार सुरू होता. त्यावेळी मीनाक्षी मंदिराच्या जवळच असलेल्या सराफा बाजारात अण्णा द्रमुक पक्षाच्या उमेदवाराची प्रचार फेरी आली होती. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच खुद्द जयदास यांनी हिंदीतून संवाद साधला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. हिंदीविरोधाचे प्रतीक ठरलेले करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षानेही हिंदी प्रचार पत्रके काढली आहेत!

अर्थात हिंदीला हे सुखाचे दिवस सहजासहजी आलेले नाहीत. दक्षिणेतील पाचही राज्यांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी झटणाऱ्या “दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा’ या संस्थेचा यात सिंहाचा वाटा आहे. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले प्रचारक होते त्यांचे सुपुत्र देवदास गांधी. नुकतीच या संस्थेने शताब्दी साजरी केली. ही संस्था दक्षिण भारतातील गैर-हिंदी भाषकांसाठी हिंदीच्या परीक्षा आयोजित करते. यावर्षी (वर्ष 2017-18) ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या साडे आठ लाखांहून अधिक आहे. दरवर्षी सरासरी अडीच लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. आतापर्यंत दोन कोटी विद्यार्थ्यांनी येथून हिंदीचे धडे घेतले आहेत, तर सुमारे सहा हजार जणांना पीएचडी, डी-लिट देण्यात आले आहेत. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, आर. वेंकट रामन, न्या. रंगनाथ मिश्रा अशा दिग्गजांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

या संस्थेसह अनेकांनी हिंदीचा प्रसार-प्रचार केला आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणावा लागेल की, द्रविड राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हिंदी विरोधाची हाक दिल्यावर त्यांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यात द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी हिंदीविरोधी आंदोलन सुरू करण्याचे सुतोवाच केले होते. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व हिंदीविरोधी आंदोलनातूनच पुढे येऊन नेतृत्वाची धुरा सांभाळणारे एम. करुणानिधी हयात होते. तरीही त्यांच्या त्या हाकेला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजेच दक्षिणेत हिंदी लोकप्रिय होत आहे. हिंदीला विरोध करून काहीही भले होणार नाही, हे तमिळनाडूच्या नव्या पिढीने जाणून घेतले आहे. म्हणूनच दक्षिण भारतीय चित्रपट आज प्रत्येक हिंदी वाहिनीवर धुमाकूळ घालत आहेत. भाषेच्या नावावर केवळ तोडफोड करण्याचा, दुसऱ्या भाषेचा द्वेष करण्याचा वसा घेतलेल्या कथित भाषाप्रेमींनी घेण्यासारखा हा धडा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)