भाषा – भाषा : भाषेच्या आधारावर साम्राज्याची अदलाबदल 

देविदास देशपांडे 

इंग्रजीच्या वर्चस्वाला शह देऊ इच्छिणाऱ्या देशांना फ्रेंच भाषा एक समर्थ पर्याय म्हणून पुढे आला आहे. फ्रॅंकोफोनी हे पर्यायी जागतिकीकरण आहे – जगाकडे पाहण्याचा तो वेगळा मार्ग आहे, असे फ्रान्सचे माजी परराष्ट्रमंत्री फिलीप दुस्ते-ब्लाझी यांनी म्हटले होते. तर एकाच साच्यातून बोलणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि निर्मिती करणाऱ्या जगाविरुद्धच्या लढाईचा फ्रॅंकोफोनी हा एक भाग आहे, असे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांनी म्हटले होते. ब्रिटन व फ्रेंच हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगावर वर्चस्व गाजवणारे देश. त्यांच्या पूर्वीच्या वसाहतींमध्ये त्यांच्या भाषांची सद्दी अजूनही टिकून आहे. त्यातील इंग्रजी प्रसरण पावत आहे तर फ्रेंच आपली सद्दी टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. यासाठी विविध देशांना आपल्याकडे वळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ब्रिटनची मक्‍तेदारी सध्या अमेरिकेने घेतली असून अमेरिकन इंग्रजी जगावर वर्चस्व गाजवते आहे. फ्रेंच भाषा तिला कितपत टक्कर देते, हे पाहणे रंगतदार ठरणार आहे. 

आर्मेनियाची राजधानी इरेव्हान येथे फ्रॅंकोफोनीची सर्वोच्च बैठक परिषद नुकतीच पार पडली. लॉर्गनिझॉं इंटरनेसनाल दि ला फ्रॅंकोफॉनी (ओआयएफ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषक या संघटनेची ही शिखर परिषद. फ्रेंच भाषा जेथे जेथे ती बोलले जाते त्या भागांचा निर्देश फ्रॅंकोफोनी या नावाने करण्यात येतो. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून फ्रेंच भाषेच्या भवितव्याबद्दल चर्चा करणे आणि कृती आराखडा तयार करणे, हा या परिषदेचा उद्देश असतो.
या परिषदेतील एक धक्‍कादायक घडामोड म्हणजे आयर्लंडने ओआयएफचे सदस्यत्व स्वीकारणे. त्या देशाला ओआयएफचे निरीक्षक सदस्यत्व देण्यात आले आहे.

आयर्लंड हा ब्रिटनच्या शेजारील देश. सर्वार्थाने इंग्रजी भाषक. मात्र शतकानुशतकांची इंग्रजी भाषा टाकून त्याने फ्रेंच भाषेचे अनुयायी व्हावे, ही गोष्ट युरोपीय खंडाच्या दृष्टीने धक्कादायक होती. याचे कारण म्हणजे युरोपीय महासंघातून (ईयू) ब्रिटन बाहेर पडणार आहे (ब्रेक्‍झिट) आणि त्यामुळे ईयूमध्ये इंग्रजी भाषकांचे प्राबल्य कमी होणार आहे. आयर्लंड आणि माल्टा हे दोनच देश इंग्रजी भाषक असतील आणि त्यात आयर्लंडला साहजिकच महत्त्व येणार आहे. मात्र तरीही इंग्रजीची कास सोडून आयर्लंडने फ्रेंचकडे आपला मोहरा का वळवावा, हा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे. आयरिश (गेइल्गे/गॅलिक) ही आयर्लंडची अधिकृत भाषा आहे.

मात्र भारताप्रमाणेच तेथे शेकडो वर्षे ब्रिटिशांचे वर्चस्व असल्यामुळे इंग्रजी ही दैनंदिन व्यवहाराची भाषा झाली आहे. किमान 42 टक्के आयरिश नागरिकांना ही भाषा येते. उत्तर आयर्लंडमध्ये आयरिश भाषेला दुसरी भाषा म्हणून मान्यता आहे. तेथे मोठ्या संख्येने लोक ही भाषा बोलू शकत असले, तरी तेथे कामकाजाची भाषा आयरिश नव्हे, तर या भाषेची बोली अल्स्टर आयरिश ही आहे. मात्र फुटबॉलमधील उपद्रव, “ब्रेक्‍झिट’ आणि इंग्रज लोकांचा अहंकार यामुळे आयरिश लोकांना ब्रिटिश लोकांबद्दल तिरस्कार वाटतो, असे आता समोर आले आहे. शिवाय आयर्लंडला आफ्रिकेशीही संबंध सुधारायचे आहेत. त्यासाठी आयर्लंडने फ्रॅंकोफोनीच्या मार्गाने आफ्रिकेत प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

दरम्यान, ऑब्जर्वेटोर दू ला लॅंग्वे फ्रांसेज (ओएलएफ) या संस्थेने आपला ताजा अहवाल सादर केला. त्यानुसार मॅंडारिन, इंग्रजी, स्पॅनिश आणि अरबीनंतर फ्रेंच ही बोलली जाणारी पाचवी भाषा ठरली आहे. आज जगातील 32 देशांची ती अधिकृत भाषा आहे. या संघटनेच्या अहवालानुसार, 2070 मध्ये फ्रेंच बोलणाऱ्यांची संख्या 47 कोटी 70 लाख आणि 74 कोटी 70 लाखांदरम्यान असू शकते. याला मुख्यतः आफ्रिकेतील लोकसंख्येत झालेली वाढ कारणीभूत असेल.

आज फ्रेंच ही केवळ फ्रान्सची भाषा राहिलेली नाही. कॅनडात इंग्रजीच्या बरोबरीने फ्रेंचचा वापर होतो अन्‌ कंबोडिया व व्हिएतनामसारख्या देशांतही तिचा प्रभाव कायम आहे. आफ्रिका खंडातल्या बहुसंख्य देशांना स्वतःची लिपी नव्हती, ती त्यांना फ्रेंच भाषेने दिली. फ्रेंचेच्या नवीन भाषकांमध्ये सब-सहारा आफ्रिकेतील 68 टक्के आणि उत्तर आफ्रिकेतील 22 टक्के लोक मोडतात. फ्रेंच वापरणारे किमान 60 टक्के लोक आफ्रिका खंडात आहेत.

नॅटिक्‍सिस बॅंकेने 2014 मध्ये केलेल्या एका पाहणीनुसार, 2050 मध्ये फ्रेंच भाषा इंग्रजी आणि मॅंडरिन भाषा अग्रस्थान पटकावणार आहे. आफ्रिकेतील वाढती लोकसंख्या हेच त्याचे कारण आहे. कारण 2100 सालापर्यंत आफ्रिकेची लोकसंख्या 80 कोटींवरून 4.5 अब्जांवर जाईल, असा अंदाज आहे.

इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे जगातील बहुतेक भाषा सध्या धास्तावल्या आहेत. फ्रेंच ही इंग्रजीच्या बरोबरीने साम्राज्य गाजविणारी भाषा. तरीही तिला आज आपल्या अस्तित्वाची काळजी वाटते आहे. अशात ब्रेक्‍झिटनंतर सर्वात मोठी भाषा म्हणून फ्रेंचला मान मिळणार आहे. ती संधी फ्रान्सला सोडायची नाही. इंग्रजी-फ्रेंच भाषेची ही खुन्नस किमान तीन ते चार शतकांची आहे. फ्रेंच भाषेकडे इंग्रजीची स्पर्धक म्हणूनच आजवर पाहिले गेले.

आज 58 देशांमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. संपूर्ण जगात 27 कोटी 40 लाख फ्रेंच भाषक आहेत. अन्‌ मॅक्रॉं यांना या फ्रॅंकोफोनीमध्ये प्रतिकारशक्ती भरून तिचे पुनरुत्थान करायचे आहे. फ्रेंच भाषेला तिचे वैभवाचे दिवस पुन्हा दाखवायचे आहेत. इंग्रजीच्या जागतिक वर्चस्वाशी त्यांना सामना करायचा आहे. ही संपूर्ण फ्रान्सचीच आकांक्षा आहे. त्यासाठी आफ्रिका हा खंड त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आफ्रिका हे फ्रॅंकोफोनीचे भविष्य आहे. लुईसा या फ्रॅंकोफोनीच्या पहिल्या आफ्रिकी महिला अध्यक्ष आहेत. तसेच त्या रवांडाच्या परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांच्या नामांकनावर आफ्रिकेत अनेकांनी नाके मुरडली आहेत.

रवांडाबरोबर राजनैतिक संबंध सुरळीत करण्यासाठीच लुईसा यांची नियुक्ती झाल्याची टीका अनेकांनी केली. काही महिन्यांपूर्वी, रवांडाचे अध्यक्ष कागमे यांनी पॅरिसला भेट दिली तेव्हा लुईसा यांच्या नावावर निश्‍चिती झाली. त्यावेळी आपल्या परराष्ट्रमंत्री फ्रॅंकोफोनी समुदायाचे नेतृत्व करतील, असे त्यांनी जाहीर केले होते तेही इंग्रजी भाषेत! तसेच रवांडातील मानवाधिकाराच्या स्थितीवरही आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसे चांगले बोलले जात नाही. या देशाने एकदा फ्रान्सला सोडचिठ्ठी देऊन इंग्रजीशी घरोबा केला होता. मात्र पुन्हा त्याला फ्रेंचकडे घेऊन येण्यात मॅक्रॉं यांनी यश मिळविले आहे. कारण मॅक्रॉं यांना फ्रॅंकोफोनी ही राष्ट्रकुलासारखी (कॉमनवेल्थ) संघटना करायची आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)