हमीभाव देण्याची मागणी
बाजार समिती मुख्य कार्यालयासमोर विविध संघटनांचे आंदोलन
पुणे- शेतमालाला मागील काही दिवसांपासून कवडीमोल भाव मिळत आहे. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभुमीवर शेतमालाला हमीभाव देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यावा. टोमॅटोपासून हमीभाव देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली.
मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. टोमॅटोला सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलोस 4 ते 5 रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेताकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर टोमॅटोला स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारशींप्रमाणे उत्पादन खर्चावर 50 टक्के अधिक हमीभाव द्यावा, या मागणीसाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, सचिव बी. जे. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष वारे आदी उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे. तसेच, बाजार समित्यांनी हमीभावासाठी हमीफंड उभारावा, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणीही डॉ. आढाव यांनी केली.
दरम्यान, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी केलेल्या आंदोलनास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहात पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात हमाल पंचायत, कामगार युनियन, तोलणार संघटना, टेम्पो पंचायत, महात्मा फुले संघटना अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी गोरख मेंगडे, नवनाथ बिनवडे, संतोष नांगरे, राजेश मोहोळ, राजेंद्र चोरघे, संजय साष्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
खैरे, देशमुखांना टोमॅटो भेट
टोमॅटोला खूपच कमी भाव मिळत आहे. साधा वाहतूक खर्चही निघत नसून, उत्पादन खर्च निघणे, ही खूप दुरची गोष्ट आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे आणि सचिव बी.जे.देशमुख यांना टोमॅटो भेट म्हणून दिले.
हमीभावाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवणार – बाजार समिती प्रशासन
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही नेहमी शेतकऱ्यांना मदत करत आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारत आली आहे. हमीभावाची मागणी केंद्र, राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. यापूर्वी केंद्र, राज्य सरकार नाशवंत मालाला हमीभावासाठी प्रयत्न करत असल्याचे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे आणि सचिव बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा