भावी पिढीसाठी बाल संस्कार शिबिरांची गरज

भामाआसखेड- आधुनिक युगातील नव्या पिढीच्या तरुणांना अध्यात्मिक संस्कृतीची ओळख व्हावी आणि साधू संतांची विचारधारा त्यांना समजून संत विचार या चिमुकल्यांच्या अंगी रुजावे म्हणून अशाप्रकारच्या वारकरी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत हभप तुकाराम महाराज मुरूमकर यांनी सेवाधाम कान्हेफाटा बाल संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्‍त केले आहे.
हल्लीच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले मामाच्या गावाला जायची विसरत चालली आहेत. सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि मुलांना पुरातन संस्कृती माहीत व्हावी आणि त्यांच्यात अध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात पाच ते तेरा वर्षे वयोगटातील सोलापूर, सिन्नर, फलटण, मुळशी, मावळ व खेड तालुक्‍यातील 62 मुले आणि 11 मुलींनी सहभाग घेतला होता. हे शिबिराचे पाचवे वर्षे असून त्यात आजवर जवळपास 300 बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. हभप संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम महाराज मुरूमकर आणि दत्तात्रय महाराज हजारे यांनी हे शिबीर यशस्वी पार पाडले.
या शिबिर कालावधीत शंकर महाराज मराठे, सुनील देवकर, संपत राऊत, नामदेव रौधळ, नंदकुमार भसे, भरत येवले, राजाराम देवकर, प्रकाश चव्हाण, कैलास पडवळ, कालिदास बोत्रे, तुकाराम करंडे यांनी भेटी दिल्या. या शिबिरात मुलांना आध्यात्म, स्वावलंबी शिक्षण, योगासने, संत विचार याविषयी माहिती देण्यात आली. या शिबिरात मुलांना श्‍लोक, पावल्या, अभंग यांसह टाळ, मृदंग, अशी वाद्यकामे शिकविण्यात आली. यावेळी जीवन विद्या मिशनचे हिरामण पडवळ यांनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर मार्गदर्शन केले. भरत महाराज काळे यांच्या कीर्तनाने शिबिराची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)