पिंपरी – विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. त्यातूनच लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून तीन लाख 40 हजार रुपये आणि एक सोन्याची चेन घेतली. यानंतर महिलेशी लग्न न करता संपर्क तोडला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 डिसेंबर 2017 पासून आजपर्यंत घडला.

पिंपरी येथील 44 वर्षीय महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरिचीत देसाई (वय 43, रा. मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मागील काही दिवसांपूर्वी शादी डॉट कॉम या विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली. त्याच साईटवर त्या महिलेची देसाई याच्यासोबत ओळख झाली. देसाई याने तो स्वतः सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. त्याला महिन्याला अडीच लाख रुपये पगार आहे. त्याचे आई-वडील अमेरिकेत राहतात आणि त्याला तीन महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. त्यासाठी त्याला लवकरात लवकर लग्न करायचे आहे. असे सांगत महिलेचा विश्वास संपादित केला.

फिर्यादी महिलेसाठी वाकड परिसरात एक घर घेऊ असे सांगून महिलेकडून त्याने तीन लाख 40 हजार रुपये आणि एक सोन्याची चेन घेतली. यानंतर घर न घेता तसेच लग्न न करता देसाई मुंबईला निघून गेला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली. देसाई विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)