भाववाढ आणि परावलंबित्व (भाग- १)

अलीकडील काळात होत चाललेली इंधन दरवाढ संपूर्ण देशभरात चिंतेचा विषय ठरली आहे. अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसंदर्भात केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश दिले आहेत. वास्तविक, कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव वाढल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. भारताला ऊर्जानिर्मितीसाठी जे इंधन लागते, त्यासाठी बव्हंशी तेलउत्पादक देशांवर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी होणे हा इंधनाच्या दरातील चढउतारांवरील एक चांगला पर्याय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या संमेलनात या दृष्टीने बऱ्याच सकारात्मक बाबींवर चर्चा आणि निर्णय झाले असून, त्याचा परिणाम आगामी काळात जाणवू लागेल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागल्यामुळे देशभरात चिंता आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढू लागल्याचा हा परिणाम असून, सामान्य नागरिकांना इंधन रास्त दराने उपलब्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना विविध स्तरांवर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. कच्च्या तेलाचे दर जेव्हा नीचांकी पातळीवर होते, तेव्हाही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर फारसे कमी झाले नव्हते.

बहुस्तरीय करआकारणी करून सरकारने विकासकामांसाठी महसूल प्राप्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या खरेदीचा खर्च या कालावधीत कमी असल्यामुळे परकीय चलनाचीही बचत झाली. हा दुहेरी लाभ सरकारला गेल्या चार वर्षांत मिळाला असल्यामुळे आता सरकारने इंधनाचे दर आटोक्‍यात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी रास्त अपेक्षा देशभरातून व्यक्त होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये होणारे चढउतार आपल्या देशावर प्रतिकूल परिणाम करणार नाहीत, या दृष्टीनेही काही पावले उचलणे गरजेचे आहे.

कच्च्या तेलाच्या दरांवर अर्थव्यवस्थेचा एकंदर वेग अवलंबून असतो. तसेच दर वाढल्यास गुंतवणूक वाढत असते. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे महागाई वाढत जाते. सर्वच स्तरांवर परिणाम करणाऱ्या या चढउतारांविषयी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर काय करता येईल, याचाही विचार करायला हवा. वस्तुतः गरिबांना परवडेल आणि सहजगत्या उपलब्ध होईल, अशा ऊर्जेची भारताला नितांत गरज आहे. त्यामुळेच कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या किमतींचे निर्धारण जबाबदारीने केले जाणे गरजेचे आहे.

भारताने महागाईचा दर आटोक्‍यात राखत विकासाचा उच्च दर गाठला आहे. या वाढत्या विकासदरामुळे येत्या दोन ते पाच वर्षांत भारताची ऊर्जेची गरज वाढत जाईल आणि प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणून कोळशाला असलेली मागणी हळूहळू कमी होत जाईल. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेत (ओईडीसी) समाविष्ट नसणाऱ्या देशांमधील ऊर्जेची मागणी वाढत आहे आणि सौरऊर्जा स्वस्त झाली आहे. त्यामुळे येत्या 25 वर्षांत ऊर्जेच्या क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या संमेलनात या क्षेत्रात भारताशी भागीदारी करण्याची इच्छा अनेक देशांनी प्रदर्शित केली आहे.

तेल आणि ऊर्जा उत्पादक तसेच उपभोक्‍त्या राष्ट्रांची ही आजवरची सर्वांत मोठी बैठक होती. अब्जावधी डॉलरच्या व्यावसायिक करारांना आणि गुंतवणुकीला या बैठकीत अंतिम रूप देण्यात आले. ऊर्जेचे शाश्‍वत स्रोत शोधून आणि वापरून पुढे जाण्याची संधी या बैठकीने सर्व देशांना उपलब्ध करून दिली आहे. या संमेलनात भारताने दोन प्रमुख प्रस्ताव मांडले. भारतासह आशियाई देशांना प्रीमिअम दराने कच्च्या तेलाची विक्री करणे तेलउत्पादक देशांनी थांबवावे, हा पहिला प्रस्ताव होता.

गॅसवर आधारित विकासदरात वृद्धी करण्याचा जो वेग भारताने दाखवून दिला आहे तो पाहता, अन्य देशांकडून गॅस उपलब्ध होण्याचा मार्ग भारतासाठी खुला व्हावा, हा दुसरा प्रस्ताव होता. या संमेलनाच्या काही दिवस आधीच पेट्रोलियम मंत्रालयातर्फे एक
सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील निष्कर्षानुसार 2030 पर्यंत भारतात तेल आणि नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात 350 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. याखेरीज ऊर्जा क्षेत्रात पुढील दहा वर्षांत 150 अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल.

पेट्रोलियम उत्पादने मोठ्या प्रमाणावर आयात करण्याऐवजी भारताने आता देशातच उत्पादन करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकपासून पेट्रोलियम उत्पादने बनविण्याची एक प्रणाली भारतीय पेट्रोलियम संस्थेने काही दिवसांपूर्वीच विकसित केली आहे. सहा शास्त्रज्ञांच्या चमूने सुमारे दहा वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळविले आहे.

एका अंदाजानुसार जगभरात तीनशे टनांहून अधिक प्लॅस्टिकचा वापर केला जातो आणि या वापरात दरवर्षी 10 ते 12 टक्‍क्‍यांची वाढ होत आहे. पॉलीथिलीन आणि पॉलीप्रोपोलिनसारखे प्लॅस्टिकचे घटक पदार्थ पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून उपयुक्त असतात. एक किलो पॉलिओलेफिनिक प्लॅस्टिकपासून 650 मिलीलिटर पेट्रोल किंवा 850 मिलीलिटर डिझेल तयार होऊ शकते. एवढाच कच्चा माल वापरून 450 ते 500 मिलीलिटर एरोमॅटिक म्हणजे विमानाचे इंधनही तयार केले जाऊ शकते.

अभय कुलकर्णी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)