भार हलका होणार (अग्रलेख)

दप्तराच्या ओझ्याने दबून गेलेले सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि त्यांच्या दप्तररूपी ओझ्यात भर घालण्यासाठी इच्छा असो वा नसो, आपला खिसा रिकामा करणारे पालक या दोघांसाठी परवाचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला. केंद्र सरकारने दप्तर हलके करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक काढले. योगायोगाने त्याच दिवशी महाराष्ट्र विधिमंडळातही एक कायदा संमत झाला. त्यानुसार खासगी शाळांनाही आता शिक्षण शुल्क समितीच्या कक्षेत आणल्यामुळे पालकांना थोडी उसंत मिळणार आहे. यामुळे थोडा मोकळा श्‍वास घेता येणार आहे. आता या निर्णयाची चांगली अंमलबजावणी तेवढी केली जाणे गरजेचे आहे. पण गळेकापू स्पर्धा आणि बाजारीकरणाच्या या कालखंडात त्यात अडथळे अनेक आहेत. तेथेच इच्छाशक्‍ती दाखवत प्रत्येक अडथळ्यावर मात करत ही शर्यत जिंकावी लागणार आहे. तेथे विद्यार्थ्यांपेक्षा पालक, तज्ज्ञ आणि धोरणकर्ते या सगळ्यांचा कस लागणार आहे. गेल्या काही काळात शिक्षणाचा खरेच बाजार झाला आहे.

शहरी भागांत मग तो कोणत्याही राज्यात असो, आपल्या आसपास आपल्याला आझे वाहणारे विविध रंगांतील विद्यार्थी रोजच दिसतात. एकाच वेळी हातात दोन तीन बॅग्ज आणि दारात घ्यायला आलेली व्हॅन, रिक्षा अथवा बसमध्ये त्यांना अक्षरश: कोंबले जाते. मोकळा श्‍वास घेण्याची फुरसत नाही व जागाही नाही. घरेसुद्धा लहान झालेली. पाचशे- साडेपाचशे स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमधून बाहेर पडणारा चिमुकला मुलगा शाळारूपी एका वेगळ्या खुराड्यात रोज सकाळी जातो व हमाली काम करत परत सायंकाळी थकून भागून परततो. ना बाहेर त्याला मोकळी हवा, ना मोकळे मैदान. कारण शहरांत जागाच नाही. शाळा उदंड झालेल्या, पण इमारत सोडली तर त्या शाळांमध्ये सुविधा नाहीत. यांच्या सुविधा फक्त प्रवेशाच्या दिल्या जाणाऱ्या माहिती पुस्तिकेपुरत्याच. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास केला जाण्याचा दावा प्रवेशाच्या सिझनमध्ये केला जातो.

पालकांना भुरळ घालण्यासाठी म्हणजेच गटविण्यासाठी इंग्रजी झाडणारे आणि आपण वेगळ्याच ग्रहावरून आलोय असे भासवत आढ्यतेखोरपणे बोलणारी मंडळी खुराड्यासारख्या इमातीत बसवली असतात. इंग्रजी न येणे किंवा येत नाही असा समज असल्यामुळे अगोदरच गारठलेले पालक शाळांच्या या तिरसट भावाने मार्केटिंग करणाऱ्या पगारी नोकरदारांच्या जाळ्यात अडकतात. किंबहुना आपल्या पोराचं भलं जर कुठे होईल तर येथेच अशी त्यांची त्या काही मिनिटांत खात्री होते. माहिती पुस्तिकेतील कोणतीही माहिती न वाचता आणि वाचली असली तरी त्याची कोणतीही शहानिशा न करता ते पैसे भरून मोकळे होतात. प्रवेश मिळण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहतात.

सकाळी काउंटर उघडल्यावर आणि आपला नंबर लागल्यावर जग जिंकल्याच्या अविर्भावात मग तेथून बाहेर पडतात. कोणत्याही गोष्टीचे खरे स्वरूप उघड होण्यासाठी आणि सत्यासत्यता समोर येण्यासाठी काही काळ जावा लागतो. तो गेल्यावर आणि घरात आपल्या पाल्याचे मार्कशीट हातात आल्यावर पालक काहीसे भानावर येतात. आपली काहीतरी गल्लत झालीये अशी शंका त्याच्या मनात उमटते व आपल्यासारखेच आणखीही काही महाभाग आहेत, याची खात्री पटल्यावर कुजबुज सुरू होते. मात्र उशीर झालेला असतो. भरमसाठ शुल्क देऊन प्रवेश अगोदरच घेतलेला असतो. आता त्यात शाळा व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने वाढ केली तरी हातात काहीच राहिलेले नसते. तेथून बाहेर पडणे व पुन्हा नव्याने श्रीगणेशा करणे किंवा आहे त्याला सामोरे जाणे एवढेच काय त्यांच्या हाती असते. झालेली चूक सुधारायला वेळही नसतो आणि यांच्या चुकीचे व शाळांनी कम्पलसरी केलेल्या बोजाचे ओझे बिचारा विद्यार्थी वाहत असतो. मूकपणे. सतत. वास्तविक शिक्षण हा काही क्षुल्लक विषय नाही. तो अत्यंत व्यापक आहे. मुलांना काय आणि कसे शिकवायचे यावर सर्वंकष विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. घेतलेल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करणे व ती निष्ठेने करणे गरजेचे असते. ते शासकीय स्तरावर झाले नाही. त्यामुळे त्यातून खासगी संस्थांचे पेव फुटले. बाहेरच्या स्पर्धेत तग धरण्यासाठी नव्हे, तर ती जिंकण्यासाठी लागणारे सर्व आमच्याकडे आहे. तुम्ही फक्त पैसा फेका.

आम्ही बघा तुमच्या मुलाला कसे परिपूर्ण प्रॉडक्‍ट करतो असे आमिष दाखवणाऱ्या या संस्था एकदा पालक भूलला की गब्बर होतात. ते म्हणतील तो कायदा व मागतील ती फी आणि सांगतील तेवढेच दप्तर. या विरोधात बोलण्याची बिशाद नाही. तसे केले तर मुलाला एकाकी पाडण्याची भीती. एक प्रकारे आजारपणात इस्पितळात दाखल केलेल्या रुग्णासारखी ही अवस्था. तुम्ही इस्पितळाचा लौकीक ऐकून दाखल तर होतात. मात्र बाहेर पडणे तुमच्या हातात नसते. आजच्या शिक्षण व्यवस्थेत असाच बाजार निरंतरपणे मांडला जातोय. ऑलराउंडर करण्याच्या नादात दप्तराचे ओझे लादले जातेय पण किमान सुविधाही नाहीत. मात्र अर्थकारण जोरात. यावर आता काही अंशी अंकुश बसेल. प्रवेश शुल्क वाढीतील मनमानीला चाप लावणारा कायदा आणि ओझे कमी करणारे पत्रक यामुळे एका रात्रीत बदल नक्कीच होणार नाही. मात्र किमान बिकट वाट आता सर्वांसाठीच काहीशी सुसह्य होईल, अशी आशा करायला हरकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)