भारत-वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

सामन्याच्या एकदिवस आगोदरच भारतीय संघाची घोषणा

राजकोट: चार वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका खेळणाऱ्या वेस्ट इंडीजसमोर मायदेशात नेहमीच जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे आव्हान आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून (गुरुवार) रंगणार असून दोन्ही संघांमधील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

-Ads-

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ दोन कसोटी, पाच वन-डे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला असून राजकोटमध्ये उद्या सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-4 असा नामुष्कीजनक पराभव पत्करलेला भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी नवोदित खेळाडूंचा भरणा असणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. या मालिकेत 2-0 ने बाजी मारल्यासच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहता येणार असल्याने भारतीय संघ या मालिकेत कोणत्याही प्रकारची ढिलाई दाखविणार नाही.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश प्रकर्षाने जाणवले आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ मधल्या फळीतील फलंदाजांचा कशा प्रकारे वापर करून घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यातच इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात शतकी कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. चेतेश्‍वर पुजाराने इंग्लंडमध्ये बचावात्मक खेळ केला असल्याने विंडीजविरुद्ध त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. अजिंक्‍य रहाणेलाही इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर टीकाकारांना उत्तर देण्याची ही उत्तम संधी आहे.

त्यातच संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींत अपयशी ठरलेल्या रविचंद्रन अश्‍विनकडे आपली कामगिरी सुधारण्याची ही अखेरची संधी आहे. तर इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी करताना आपली उपयुक्‍तता सिद्ध केली असून संघातील आपले स्थान पक्‍के केले असले, तरी त्याला या मालिकेत चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.

विंडीज संघात अनेक बदल

चार वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आणि आताच्या विंडीज संघात अनेक बदल असून, या संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष राहील. कारण सध्याच्या विंडीज संघातील केवळ होल्डर, बिशू, ब्रेथवेट, गॅब्रिएल, पॉवेल, केमार रोच यांनाच केवळ भारतात खेळण्याचा अनुभव आहे. सुनील ऍम्ब्रिस, रोस्टन चेस, डावरिच, हॅमिल्टन, हेतमायेर, शाई होप, शेरमन, किमो पॉल, वॉरिकन हे प्रथमच भारतात कसोटी खेळतील. वेस्ट इंडीजच्या संघाकडील नवोदित खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. सर्वात नवोदित असणारा सुनील ऍम्ब्रिस वेस्ट इंडीजकडून केवळ दोनच कसोटी सामने खेळला आहे. भारत दौऱ्यातील एकमेव सराव सामन्यात अध्यक्षीय संघाविरुद्ध नाबाद 114 धावांची खेळी करताना त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कसोटी पदार्पणात तो पहिल्याच चेंडूवर हिट विकेट झाला होता. तसेच 21 वर्षीय शिमरन हेतमायरच्या कामगिरीकडेही साऱ्यांचे लक्ष असेल. त्याने 6 कसोटीत दोन अर्धशतकांसह 322 धावा केल्या आहेत. 2016च्या 19 वर्षांखालील विश्‍वचषक विजेत्या विंडीज संघाचा तो कर्णधार होता. 20 वर्षीय किमी पॉल हा अष्टपैलू खेळाडू कारकिर्दीतील दुसरी कसोटी खेळण्यास सज्ज आहे. बांगलादेशविरुद्ध जुलैमध्ये झालेल्या पदार्पणाच्या कसोटीत त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. 26 वर्षीय जोमेल वॉरिकन आणि 22 वर्षीय शेरमन लेविस भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यास उत्सुक आहेत.

रोचच्या गैरहजेरीचा विंडीजचा फटका

वेस्ट इंडीजला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. वेगवान माऱ्याचा प्रमुख आधारस्तंभ असेलला केमार रोच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. आजीच्या निधनामुळे तो तातडीने मायदेशी परतला आहे. पहिल्या कसोटीच्या कालावधीत तो भारतात परतेल अशी अपेक्षा असल्याचे वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले आहे. केमार रोचने 48 कसोटी सामन्यांत 28.31च्या सरासरीने 163 बळी मिळवले आहेत. त्याच्या शिवाय शेनॉन गॅब्रिएल (37 कसोटी), कर्णधार जेसन होल्डर (34 कसोटी), किमो पॉल (एक कसोटी) आणि शर्मन लेविस यांचा वेस्ट इंडीजच्या वेगवान माऱ्यात समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून वेस्ट इंडीज संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडूला पूर्ण पन्नास कसोटींचाही अनुभव नाही. या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू आहे तो 25 वर्षीय क्रेग ब्रेथवेट. त्याने 49 कसोटींत 3263 धावा करताना 14 विकेटही घेतल्या आहेत. त्याखालोखाल क्रमांक लागतो तो 30 वर्षीय वेगवान गोलंदाज केमार रोचचा. यानंतर पॉवेल (36 कसोटींत 1881 धावा), शाई होप (22 कसोटींत 1210 धावा), गॅब्रिएल (37 कसोटींत 111 विकेट) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे संघाची कामगिरी उंचावण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याची जबाबदारी या खेळाडूंवरच राहील.

प्रतिस्पर्धी संघ –
भारतीय संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दूल ठाकूर.
वेस्ट इंडीज संघ – जेसन होल्डर (कर्णधार), सुनील ऍम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टॉन चेस, शेन डाऊरिच, शेनॉन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरॉन हेतमायर, शाई होप, शर्मन लेविस, किमो पॉल, केमार रोच व जोमेल वॉरिकन.
सामन्याची वेळ- सकाळी 10-00 पासून.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)