भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

कोलंबो – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळविला. सलग चौथ्या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताने ठेवलेल्या 376 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची संपूर्ण टीम 207 धावांत गारद झाली. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तडाखेबंद शतकांच्या बळावर लंकेसमोर 375 बाद धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याच्या एकाकी झुंजीमुळे लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वेगवान शतके

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारण्याचा कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे भारतीय फलंदाजांनी दाखवून दिले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वेगवान शतके आणि त्यांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीपाठोपाठ त्रिशतकी सामना खेळणारा महेंद्रसिंग धोनी आणि मनीष पांडे यांनी केलेल्या अखंडित शतकी भागीदारीमुळे भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 375 धावांची मजल मारताना श्रीलंकेसमोर खडतर आव्हान ठेवले.

विराट-रोहितची द्विशतकी भागीदारी
फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय भारताने घेतला खरा, परंतु शिखर धवनचा बळी दुसऱ्याच षटकात गमावल्यामुळे भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. अर्थात भरात असलेला रोहित शर्मा आणि सूर गवसलेला विराट कोहली यांनी त्याची पुरेपूर भरपाई करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांवर संपूर्ण वर्चस्व गाजवीत प्रथम शतकी आणि मग द्विशतकी भागीदारी रचून भारताला मजबूत पायाभरणी करून दिली. विराटने केवळ 96 चेंडूंत 17 चौकार व 2 षटकारांसह 131 धावांची झंझावाती खेळी केली. तर रोहितने 88 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 104 धावा फटकावल्या. या जोडीने भागीदारीचे अर्धशतक 46 चेंडूंत पूर्ण केले, तर भागीदारीचे शतक झळकावण्यासाठी या जोडीला केवळ 76 चेंडू लागले.

विराट-रोहित जोडीने भागीदारीचे दीडशतक केवळ 118 चेंडूंत, तर द्विशतक 154 चेंडूंत पूर्ण करीत भारताला वेगवान प्रारंभ करून दिला. दरम्यान विराटने आपले 45वे वन डे अर्धशतक 38 चेंडूंत पूर्ण केले. तर रोहितला आपले 33वे वन डे अर्धशतक झळकावण्यासाठी 45 चेंडू लागले. विराटने आपले 29वे वन डे शतक केवळ 76 चेंडूंत पूर्ण केले. त्यात 14 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. रोहितने आपले 13वे वन डे शतक 85 चेंडूंत झळकावले. त्यात 10 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. भारताच्या 50 धावा नवव्या षटकात, तर 100 धावा चौदाव्या षटकात पूर्ण झाल्या. भारताच्या धावांचे दीडशतक 21व्या, तर द्विशतक 26व्या षटकात झळकले.

घसरगुंडीनंतर धोनी-पांडेची शतकी भागीदारी
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची द्विशतकी भागीदारी अखेर लसिथ मलिंगाने फोडली. त्याने विराट कोहलीला बाद करीत श्रीलंकेला दिलासा दिला. त्यानंतर रोहित शर्माच्या साथीत 37 धावांची भागीदारी केल्यावर हार्दिक पांड्याही परतला. 19 धावा करणाऱ्या पांड्याला मॅथ्यूजने परतविले. मॅथ्यूजने पुढच्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद करून भारताला हादरा दिला. तसेच तिसरा सामना गाजविणाऱ्या अकिला धनंजयाने लोकेश राहुलला केवळ 7 धावांवर परतवून भारताची एक बाद 225 वरून 5 बाद 274 अशी घसरगुंडी घडवून आणली. परंतु याच वेळी त्रिशतकी वन डे सामना खेळणारा महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवच्या जागी संधी मिळालेला मनीष पांडे यांची जोडी जमली.

या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत भारताला पावणेचारशेची मजल मारून दिली. धोनीचे 66वे वन डे अर्धशतक केवळ 1 धावेने हुकले. त्याने 42 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह नाबाद 49 धावा फटकावल्या. तर पांडेने 42 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या. पांडेचे हे पहिलेच एकदिवसीय अर्धशतक ठरले. या जोडीने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी 44 चेंडूंत पूर्ण केली. तर भागीदारीचे शतक केवळ 73 चेंडूत पूर्ण झाले. या जोडीने 12.2 षटकांत 101 धावांची अभेद्य भागीदारी केली. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 2, तर मलिंगा, फर्नांडो व धनंजया यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)