विरोधकांना उशिरा जाग

मुंबई: इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या “भारत बंद’ला शिवसेनाचा पाठिंबा नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना उशिरा जाग आली आहे. आम्ही आधीपासूनच महागाई वाढल्याचे सांगत आलो आहोत. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.

कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात “भारत बंद’चे आवाहन केले आहे. महागाई व इंधन दरवाढीविरोधात नेहमी केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारा भाजपाचा सहकारी पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना “भारत बंद’मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले, विरोधकांनी त्यांची ताकद जरुर दाखवावी. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असणे गरजेचे आहे. शिवसेना बंदकडे तटस्थपणे पाहत आहे. महागाई वाढली आहे, विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका चोख बजावावी, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)