मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने इंधनाचे दर गगनाला भिडलेली आहेत. यामुळे महागाईत भर पडत असून त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने सोमवारी “भारत बंद’ची हाक दिली आहे. कॉंग्रेसने पुकारलेल्या “भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाणे येथील नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. त्यानंतर मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत कॉंग्रेसकडून “भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन “भारत बंद’ला पाठिंबा देतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी बैठकीनंतर जाहीर केलेल्या एका पत्रकाद्वारे दिली. त्याचबरोबर “भारत बंद’ला मनसे कार्यकर्ते संपूर्ण पाठिंबा देतील, याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेवून केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना व मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्याला राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)