भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, विकासदर 8.2 टक्क्यांवर

पहिल्या तिमाहीत विकासदर उसळल्याने सरकारला दिलासा

मॅन्युफॅक्‍चरिंग आणि कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढली

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीतील विकासदर 8.2 टक्‍के इतका मोजला गेला आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच एखाद्या तिमाहीत विकासदर इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2016 च्या पहिल्या तिमाहीत विकासदर या पातळीवर गेला होता.

मात्र, सरकारने या आकडेवारीने फार हुरळून जाऊ नये. कारण विकासदराला ब्रेक देणाऱ्या अनेक बाबी सध्या दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात रुपयाचे घसरणे सरकारला रोखावे लागणार आहे. कारण त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. त्याबरोबर महाग होत असलेले क्रुड सरकारची डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय गेल्या वर्षी या काळात विकासदर फारच कमी होता त्यामुळे तुलनेने तो जास्त वाटत असल्याचे बोलले जात आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या तिमाहीत मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्राने विकासदर वाढण्याला आधार दिला आहे. चीनचा या तिमाहीतील विकासदर केवळ 6.7 टक्‍के आहे. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश म्हणून कायम राहिला आहे. आगामी काळात चीनचा विकासदर फारसा वाढणार नसल्याचे चीननेही मान्य केले आहे.

2017-18 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचे एकूण सकल उत्पन्न 31.18 लाख कोटी रुपये होते. ते आताच्या तिमाहीत 8.2 टक्‍क्‍यानी वाढून 33.74 लाख कोटी रुपये झाल्याचे सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

या तिमाहीत मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता तब्बल 13.5 टक्‍क्‍यानी वाढली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 1.8 टक्‍क्‍यानी कमी झाली होती. त्यामुळे आताची आकडेवारी अधिक आकर्षक झाली असल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर या तिमाहीत कृषी क्षेत्राची उत्पादकता तब्बल 5.3 टक्‍क्‍यानी वाढली आहे. जी की गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत केवळ 3 टक्‍क्‍यानी वाढली होती. या वर्षी पूर्ण भारतात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे आगामी तीन तिमाहीतही या क्षेत्राची उत्पादकता वाढणार असल्याचे सरकारला वाटते. ऑक्‍टेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी या आकडेवारीवर काळजीपूर्वक विचार केला जाण्याची शक्‍यता आहे.
नोटाबंदी, राफेल करार यावरून सरकारवर विरोधक तुटून पडलेले असताना वाढीव विकासदराची बातमी समोर आली आहे.

2017 मध्ये जीडीपी 7.7 टक्‍क्‍यांवर आला होता. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आणि अर्थव्यवस्था कोलमडली अशी टीका होत असतानाच विकास दर 8.2 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहचला आहे. मागील 18 तिमाहीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत असे सरकारकडून सांगितले जात आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर विकासदरात घसरण झाली होती. मात्र आता या तिमाहीत विकासदराने मोठी उसळी घेतली आहे. अर्थतज्ज्ञांनी विकासदराबाबत जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार या तिमाहीचा विकास दर 7.5 टक्‍क्‍यांपर्यंत राहील असे वाटत होते. मात्र विकासदराने उसळी घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)