भारत आणि रशिया दरम्यान एस-400 क्षेपणास्त्रासंबंधी करार होण्याची शक्‍यता 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज पासुन भारत दौऱ्यावर 
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्‍यता आहे. पुतिन यांचे परराष्ट्र धोरण विषयक सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी ही माहिती दिली. भारता बरोबर एस-400 करार करण्यासंबंधी पहिल्यांदा रशियन सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. मात्र या कराराला अमेरिका विरोध करतो आहे.
अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-35 फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-400 मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांवर निर्बंध घातले आहेत.
5 ऑक्‍टोंबरला मोदी आणि पुतिन द्विपक्षीय चर्चा करतील. त्यावेळी करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्‍यता आहे. भारत आणि रशियामध्ये होणाऱ्या या करारात अमेरिकेकडून अडथळा आणला जाण्याची दाट शक्‍यता आहे. रशिया बरोबर शस्त्रास्त्र करार केला तर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-400 ट्रायम्फ मिसाइल सिस्टिम खरेदीचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना आता अमेरिकेकडून या करारामध्ये अडथळा आणला जातो आहे.
एस-400 ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. भारत गेल्या कित्येक वर्षांपासून रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत आहे. अलीकडेच झालेल्या टू प्लस टू बैठकीत एस-400 च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आले. पण अमेरिकेने अद्याप कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. एस-400 मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)