भारत आणि पाकिस्तानी लष्कर करणार एकत्रित युद्धसराव

सप्टेंबर महिन्यात रशियातील युद्धसरावात 8 देशांचा सहभाग

नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या दहशतवाद विरोधी युद्धसरावामध्ये भारताबरोबर पाकिस्तानही सहभागी होणार आहे. या युद्धसरावामध्ये चीन आणि अन्य काही देशही सहभागी होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

रशियातील युराल पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या या युद्धसरावामध्ये “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन’मधील बहुतेक सर्व देश सहभागी होणार आहेत. या संघटनेतील आठही देशांमध्ये दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवणे आणि शांतता मिशन हा या युद्धसरावाचा प्रमुख उद्देश असणार आहे. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये झालेल्या “शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायजेशन’च्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी या युद्धसरावातील भारत सहभागी होणार असल्याचे स्पष्त केले आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान दोन्ही परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी देश एकाच युद्धसरावामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या दोन्ही देशांच्या लष्करांनी संयुक्‍त राष्ट्राच्या शांतता मोहिमांमध्ये यापूर्वी एकत्र भाग घेतला होता, मात्र युद्धसराव केलेला नव्हता.

भारताला रशियाचा तर पाकिस्तानला चीनचा पाठिंबा…
“शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन’ (एससीओ)या गटाची स्थापना 2001 मध्ये चीनच्या पुढाकाराने झाली होती. त्यामध्ये रशिया, चीन, किरगिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान हे देश सहभागी आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना “एससीओ’चे निरीक्षक म्हणून 2005 साली सहभागी करून घेतले गेले, तर गेल्याच वर्षी या दोन्ही देशांना या गटाचे पूर्ण सदस्य करून घेतले गेले. भारताच्या सहभागाला रशियाने तर पाकिस्तानच्या सहभागाला चीनने पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)