भारतीय लष्कर शस्त्रसंधी भंगाला चोख प्रत्युत्तर देईल-जेटली

पाकिस्तानला जोरदार इशारा
श्रीनगर –सीमेवरील शस्त्रसंधी भंगाच्या कुठल्याही प्रकाराला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देईल, अशी परखड भूमिका आज संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी मांडली. त्यातून त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष पण जोरदार इशारा दिला आहे.
जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भागांना भेट दिल्यानंतर जेटली पत्रकारांशी बोलत होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा करण्याचे सत्र आरंभले आहे. यापार्श्‍वभूमीवर, त्यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून इशारा दिला. दहशतवाद्यांचे घुसखोरीचे डाव उधळून लावण्यासाठी लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादी आणि विभाजनवादी संघटनांना सीमेपलिकडून आर्थिक मदत केली जाते. काश्‍मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी, हत्या घडवण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्ता उद्धवस्त करण्यासाठी पैसा पुरवला जातो. या कारवाया केवळ भारतीय राज्याच्याच नव्हे तर काश्‍मीरी जनतेच्या विरोधातीलही कारस्थाने आहेत, असे त्यांनी नमूद केले. जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात. मात्र, शांतता असेल तरच ते घडू शकते, असे म्हणत त्यांनी स्थिती सुरळित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)