भारतीय लष्कराला 30 वर्षांनंतर मिळाल्या हॉवित्झर तोफा

नवी दिल्ली  -अमेरिकेतून आज दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा भारतात दाखल झाल्या. त्यामुळे भारतीय लष्कराला 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नव्या तोफा मिळाल्या आहेत.
भारताने याआधी 1980 च्या दशकातील उत्तरार्धात बोफोर्स या स्वीडिश कंपनीकडून हॉवित्झर तोफा खरेदी केल्या. मात्र, त्या व्यवहारात अनियमिततेचा आरोप झाला. त्या बोफोर्स घोटाळ्याने मोठे राजकीय वादळ उठवल्याने भारतीय लष्करासाठीच्या तोफा खरेदी प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाला. अखेर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये सरकारी पातळीवर 145 हॉवित्झर तोफांच्या खरेदीसाठी सुमारे 5 हजार कोटी रूपयांचा करार झाला. त्यानुसार बीएई सिस्टीम्सने तयार केलेल्या 25 तोफा अमेरिककडून पुरवल्या जाणार आहेत. त्यातील 2 तोफा भारतात दाखल झाल्या. उर्वरित तोफा बीएई सिस्टीम्स आणि महिंद्रा डिफेन्सच्या संयुक्त विद्यमाने भारतातच बनवल्या जाणार आहेत.
दरम्यान, भारतात दाखल झालेल्या 2 तोफा चाचणीसाठी राजस्थानच्या पोखरणमध्ये नेण्यात आल्या. या तोफा 30 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकतात. या तोफा प्रामुख्याने चीनलगतच्या सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)