भारतीय राज्यघटना आदर्शवत: संजीवराजे

आंतरजातीय विवाहित दांपत्यांचा सत्कार करताना संजीवराजे ना.निंबाळकर, शेजारी राजेश पवार मनोज पवार आदी

हा विषय कधी संपणार…
आंतरजातीय विवाहातून जातीयव्यवस्था नष्ट करता येणार आहे. असा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. मात्र, एकविसाव्या शतकात ही आंतरजातीय विवाहित दांपत्यांचा सत्कार करणे म्हणजे विशेष बाब मानली जात आहे. आंतरजातीय विवाहांना विरोधाचे विषय कधी संपणार हा सुध्दा एक प्रश्‍न आहे. परंतु आजू बाजूच्या घडणाऱ्या घटना पाहता आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांच्या धाडसाचे कौतुकच केले पाहिजे, असे संजीवराजे यावेळी म्हणाले.

विद्यार्थी व आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांचा गौरव
सातारा,दि.14 प्रतिनिधी: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेली राज्यघटना ही सर्व भारतीय नागरिकांना सोबत घेवून जाणारी आहे. जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून पाहिले जात आहे. राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये येत आहेत. यावरून संपुर्ण जगासाठी भारताची राज्यघटना आदर्शवत ठरली आहे. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण व समाकल्याण विभागाच्यावतीने 2016-17 मध्ये इयत्ता सातवीच्या मागावर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रत्येक तालुक्‍यातील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आंतरजातीय विवाहित दांपत्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप आणि उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपिठावर शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, कृषी सभापती मनोज पवार, जि.प.सदस्य सोनाली पोळ, पं.स.सदस्य रंजना जाधव, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जावेद शेख, चंद्रशेखर जगताप, लेखाधिकारी विलासराव पाटील प्रा.शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, मा.शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ, प्रभारी समाजकल्याण अधिकारी चांगदेव बागल उपस्थित होते.
संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले, हजारो वर्षांपुर्वीची जातीयव्यवस्था आज ही पहायला मिळत आहे. समाजात अद्याप अंधश्रध्दा कायम असून मुनष्याची मानसिक गुलामगिरीतून सुटका झालेली नाही. सुटका होण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. शिक्षणामुळे कर्मठ दूर तर होणारच आहेत त्याचबरोबर मनुष्य म्हणून जगण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते. त्यांनी परदेशात एकाच वेळी अर्थ व कायदा विषयात उच्चशिक्षण घेतले. एकाच वेळी त्यांनी कायदेपंडित व अर्थतज्ञाची पदवी कोलंबिया विद्यापिठातून घेतली. शिक्षणातून प्राप्त केलेल्या विद्वतेचा उपयोग त्यांनी उपेक्षित समाजबांधवांना सामाजिक व आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी केला. त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून साजरा न होता आता ज्ञानउत्सव म्हणून साजरा केला पाहिजे असे संजीवराजे यांनी यावेळी सांगितले.

प्रा.महेश गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्याला फुले व आंबेडकरांचे नाते आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम सर्वांना करावे लागणार आहे. शिक्षणातून मानसिक गुलामगिरी घालविण्याची शिकवण बाबासाहेबांनी दिली. गुलामगिरी विरोधात लढण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मानसिक गुलामगिरीच्या घातलेल्या बेड्या झुगारून टाकण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराने पुढे जाणे आवश्‍यक आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

पुढील जयंतीला अधिक विद्यार्थी हजर असतील
कार्यक्रमाला केवळ पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व पालक वगळता उर्वरित विद्यार्थी तसेच शिक्षक ही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यावर भाष्य करताना संजीवराजे म्हणाले, जयंतीदिवस हा ज्ञानदानाचा दिवस आहे. या दिवशी आयोजित कार्यक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाणे आवश्‍यक होते. परंतु पुढील जयंतीला अधिकाधिक विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, अशा शब्दात संजीवराजे यांनी शिक्षणविभागाचे कान टोचले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)