भारतीय मुलीमुळे आयर्लंडमध्ये झाला मोठा बदल

नवी दिल्ली : आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत नोंदवत आपले समर्थन दर्शवले आहे. या निकालामुळे एका संघर्षाचा विजय झाला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यासच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते.  मात्र बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती येथे नाही. दरम्यान, गर्भपातासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे भारताच्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला आहे.

कर्नाटकमधील बेळगावातील सविता हलप्पनवारचे कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्याने तिचा आयर्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्याने सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता व येथून संघर्षास सुरुवात झाली.

येथील पंतप्रधान लिओ वरदकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. गर्भपातासंबंधी आलेल्या पहिल्या अधिकृत अहवालानुसार गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी 66 जणांनी समर्थन दर्शवले आहे. वरदकर यांनी असेही सांगितले की, लोकांनी आपले मत जाहीरपणे मांडले आहे. एका आधुनिक देशासाठी आधुनिक संविधानाची आवश्यकता आहे.

दरम्यान, या निकालामुळे सविताचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. सविताचे वडील म्हणाले की, ”मी या बातमीमुळे अत्यंत खूश आहे. गर्भपाताच्या नवीन कायद्याला माझ्या मुलीचे नाव द्यावे. नव्या कायद्याला ‘सविता लॉ’ असे नाव देण्यात यावे, अशी आमची शेवटची इच्छा आहे.  शिवाय, या चाचणीमध्ये समर्थन दर्शवणाऱ्या आयर्लंडमधील नागरिकांचे मी धन्यवाद करू इच्छितो. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून कित्येक महिलांनी यासाठी संघर्ष केला आहे”.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)