भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात

तिसरा टी-20 क्रिकेट सामना

जेमिमा रॉड्रिग्जची झंझावाती अर्धशतकी खेळी

-Ads-

कोलंबो: अरुंधती रेड्डी आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या भेदक गोलंदाजीनंतर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा पाच गडी आणि 10 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय महिला संघाने 2-0 अशी आघाडी घेतली असून मालिका जिंकण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची गरज आहे.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा डाव निर्धारित 20 षटकांत 8 बाद 131 धावांवर रोखला. युवा मध्यमगती गोलंदाज अरुंधती रेड्डीने 19 धावांत 2 बळी घेतले. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 3 धावांत 2 बळी घेत तिला साथ दिली. जेमिमाची धडाकेबाज खेळी आणि हरमनप्रीतच्या साथीत तिने केलेल्या भागीदारीमुळे भारतीय महिला संघाने 18.2 षटकांत 5 बाद 132 धावा फटकावून आकर्षक विजयाची नोंद केली.

विजयासाठी 132 धावांच्या आव्हानासमोर स्मृती मंधाना (6), मिताली राज (13) आणि तानिया भाटिया (5) लवकर परतल्याने भारतीय महिला संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. परंतु जेमिमा रॉड्रिग्जने हरमनप्रीत कौरच्या साथीत 6.1 षटकांत 53 धावांची भागीदारी करीत भारताला विजयपथावर नेले. जेमिमाने 40 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 57 धावा फटकावल्या.

हरमनप्रीतने 19 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 24 धावांची खेळी करून तिला साथ दिली. या दोघीही लागोपाठ बाद झाल्या. परंतु वेदा कृष्णमूर्ती (नाबाद 11) आणि अनुजा पाटील (नाबाद 8) यांनी भारतीय महिलांचा विजय साकार केला. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अटापट्टूने दोन, तर दिलहारी, सिरिवर्धने आणि प्रबोधिनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्याआधी चमारी अटापट्टू, नीलाक्षी डीसिल्व्हा आणि शशिकला सिरिवर्धने वगळता श्रीलंकेच्या बाकी फलंदाज अपयशी ठरल्या. चमारीने 3 चौकार व 1 षटकारासह 28 धावा केल्या. तर नीलाक्षीने 20 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 31 धावा फटकावल्या. शशिकलाने 32 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 35 धावांची खेळी केली. भारतीय महिलांकडून अरुंधती रेड्डीने 19 धावांत 2, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 3 धावांत 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका महिला संघ- 20 षटकांत 8 बाद 131 (चमारी अटापट्टू 28, नीलाक्षी डीसिल्व्हा 31, शशिकला सिरिवर्धने 35, अरुंधती रेड्डी 19-2, हरमनप्रीत कौर 3-2) पराभूत विरुद्ध भारतीय महिला संघ- 18.2 षटकांत 5 बाद 132 (जेमिमा रॉड्रिग्ज 57, हरमनप्रीत कौर 24)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)