भारतीय बॅडमिंटनपटूंचे युक्रेन स्पर्धेत दुहेरी यश 

नवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनपटूंनी युक्रेनमधील खार्किव्ह येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावताना चमकदार कामगिरी बजावली. भारतीय जोड्यांनी या स्पर्धेत मिश्र व पुरुष दुहेरीत अजिंक्‍यपद संपादन केले.
अनुष्का पारीख आणि सौरभ शर्मा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. अनुष्का आणि सौरभ या तृतीय मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत पॉवेल स्मिलोव्हस्की आणि मॅग्दालेना स्विर्कझिन्स्का या पोलंडच्या चतुर्थ मानांकित जोडीचे आव्हान 18-21, 21-19, 22-20 असे कडव्या संघर्षानंतर मोडून काढत विजेतेपदाची निश्‍चिती केली. ही चुरशीची अंतिम लढत एक तासाहून अधिक काळ रंगली.
त्यानंतर कृष्ण प्रसाद गर्ग आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावीत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. कृष्ण प्रसाद व ध्रुव कपिला या जोडीने अंतिम फेरीच्या सामन्यात डॅनियल हेस आणि जोहानस पिस्तोरियस या जर्मनीच्या जोडीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा केवळ 36 मिनिटांत मोडून काढताना विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य भारतीय खेळाडूंपैकी अन्य भारतीयांपैकी सिमरन सिंघी व रितिका ठाकर या भारतीय जोडीला महिला दुहेरीतील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तसेच रोहन कपूर व कुहू गर्ग या अग्रमानांकित जोडीला मिश्र दुहेरीतील उपान्त्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्‍का बसला. त्याचप्रमाणे रोहन कपूर व शिवम शर्मा या द्वितीय मानांकित भारतीय जोडीचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)