भारतीय डीजीएमओचा पाकला इशारा

प्रत्युत्तराचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे

नवी दिल्ली – पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबारेषेवरून भारतीय हद्दीत हल्ला केल्यानंतर काही वेळानेच पाकिस्तानच्या डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी दूरध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली. त्यावेळी प्रत्युत्तराचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे असा इशारा भारतातर्फे त्यांना देण्यात आला आहे.

भारतीय लष्कराचे डायरेक्‍टर जनरल ऑफ मिलटरी ऑपरेशन लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले की प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता कायम राखण्याबाबत आम्हीं गंभीर आहोत. तथापी आमच्या हद्दीत होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा हक्कही आम्ही राखून ठेवला आहे असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता राखण्याचे प्रयत्न एकतर्फी पद्धतीने कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. त्याला दुसऱ्याबाजूकडूनही तितकाच योग्य प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजौरी जिल्ह्याच्या सीमा भागात पाकिस्तानी लष्कराने मॉर्टर शेलचा मारा केल्यानंतर भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे त्या नंतर तीन तासांनी दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये ही दूरध्वनी चर्चा झाली. पाकिस्तानचे कमांडर मेजर जनरल शाहीर समशाद मिर्झा यांनी भारतीय अधिकाऱ्यांना हा फोन केला. त्यावेळी त्यांनी भारतीय बाजूकडून होणाऱ्या माऱ्याविषयी तक्रार केली. पाकिस्तानच्या अथमुकाम सेक्‍टर मध्ये भारतीय हद्दीतून करण्यात आलेल्या माऱ्यात चार पाकिस्तानी जवान आणि एक नागरीक असे एकूण पाच जण ठार झाले आहेत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

त्यावेळी भारतीय बाजूकडून त्यांना असे स्पष्ट करण्यात आले की भारताकडून झालेला प्रत्येक गोळीबार हा पाकिस्तानी बाजूकडून झालेल्या गोळीबाराला उत्तर होते. स्वता भारताने कधीही प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता भंग होईल असा प्रयत्न केलेला नाही. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सीमे पलिकडून भारतीय हद्दीत अतिरेकी घुसवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी सपोर्ट फायरिंग नेहमी केले जाते ही बाबही त्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)