भारतीय कबड्डीतील मक्तेदारी संपणार का?

कबड्डी म्हणजे अस्सल भारतीय मातीतला खेळ गेली कित्येक दशके या खेळावर भारताची हुकूमत भारत आणि कबड्डी हे जणू समीकरणच झाले होते. स्पर्धा कोणतीही असो कबड्डी मध्ये भारतच अव्वल राहणार हे सांगायला कोणा तज्ज्ञांची गरज पडत नव्हती. भारतामुळेच कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली. विशेषतः आशियाई देशांमध्ये कबड्डी लोकप्रिय झाली ती भारतामुळेच. आशियाई देशांनी कबड्डीतील बारकावे शिकले.

पाकिस्तान, बांग्लादेश, जपान, कोरिया, अफगाणिस्तान, इराण या देशांनी कबड्डीमध्ये विशेष प्रगती केली तरीही कबड्डीमध्ये भारताची मक्तेदारी होती. पुरुष असो वा महिला भारतीय कबड्डी संघ हा इतर देशांच्या मानाने खूप पुढे होता. म्हणूनच  भारताला पराजित करणे अशक्यच आहे. असाच समज भारतातील कबड्डी प्रेमींना झाला होता. भारतीय कबड्डीपटूंना देखील हाच अतिआत्मविश्वास होता आणि हाच अतिआत्मविश्वास भारतीय संघाला नडला. याच अतिआत्मविश्वासाने भारतीय कबड्डीचा घात केला व भारताची कबड्डीमधील मक्तेदारी संपुष्टात आली. भारताची कबड्डीतील मक्तेदारी संपुष्टात आणली ती इराणने.

आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने भारताला उपांत्यफेरीतच पराभूत करीत भारताचे सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न भंग केले. सुवर्णपदकाची अपेक्षा करणाऱ्या भारताच्या पदरी कांस्यपदक पडले. जी अवस्था पुरुष संघाची झाली तीच अवस्था महिला संघाची झाली. महिलांनी किमान एक पाऊल पुढे टाकीत रौप्यपदक मिळवून दिले. महिलांनाही इराणनेच रोखले. पुरुष व महिला संघाचे हे अपयश भारतीयांसाठी धक्कादायक आहे.

भारतीय कबड्डीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. 1918 साली महाराष्ट्रातील सातारा येथे कबड्डीला (हुतुतू)ला सुरूवात झाली. भारतीय कबड्डीला 100 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय कबड्डीची झालेली ही अवस्था क्लेशदायक आहे. या पराभवाचे विश्लेषण करताना असे जाणवते की, या पराभवाला मैदानावरील खेळाडूंच्या चुकांसोबतच मैदानाबाहेरच्या घडामोडी देखील जबाबदार आहेत. भारतीय संघ जकार्ताला जाण्यापूर्वी जनार्दनसिंग गहेलोत यांची राष्ट्रीय संघटनेवरील सत्ता दिल्ली उच्च न्यायालयाने संपुष्टात आणली. त्यांच्या पत्नी मृदुला भदोरीया यांचे अध्यक्षपद बरखास्त करण्यात आले. या घडामोडींचा खेळाडूंवर परिणाम झालाच असेल. शिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेला जो संघ निवडण्यात आला होता तो योग्य नाही म्हणून निवड समितीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. दोन्ही संघात डाव्या व उजव्या मध्यराक्षकांचा अभाव होताय. फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना डावलून जे खेळाडू इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळण्यास पात्र नव्हते अशा खेळाडूंना निवडण्यात आले होते.

मैदानात देखील खेळाडूंमध्ये एकी दिसत नव्हती. भारतीय संघात सुसूत्रता नव्हती. एक संघ म्हणून भारतीय संघ स्पर्धेत कोठेच दिसला नाही. प्रशिक्षक व कर्णधार यांच्यात दरी निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण स्पर्धेत दिसले. साखळी सामन्यात कोरिया विरुद्ध पराभूत होऊनही आपल्या खेळाडूंनी कोणताही धडा घेतला नाही. खेळातील त्रुटी शोधून त्यावर उपाय केला नाही. उलट भारतीय संघातील त्रुटींचा विरुद्ध संघांनी लाभ उठवला. प्रो-कबड्डी लीगमध्ये भारतासोबतच परदेशातील खेळाडूही सहभागी होतात. प्रो-कबड्डीमुळे भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे परदेशी खेळाडू हेरू लागले आहेत. हे कच्चे दुवे हेरूनच कोरियन व इराणीयन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना अस्मान दाखवले आहे. आता या पराभवातून भारताने योग्य तो धडा घ्यायला हवा. हा पराभव म्हणजे दुःखद स्वप्न होते हे स्वप्न विसरून भारताने नव्याने सुरूवात करायला हवी.

मैदानाबाहेरील घडामोडींचा मैदानावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. जनार्दनसिंग गेहलोत यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर सरकारने नव्या कबड्डी महासंघाची निवड करायला हवी. शिवाय नव्या महासंघात ज्यांची निवड होईल. त्यांची कबड्डीवर एकाधिरशाही राहू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर अंकुश ठेवायला हवा. आताची निवड समिती बरखास्त करून नवी निवड समिती स्थापन करायला हवी. खेळाडूंच्या कामगिरीवरच त्यांची निवड व्हायला हवी. वशिलेबाजीला थारा मिळता कामा नये. जी अवस्था भारतीय हॉकीची झाली आहे ती अवस्था कबड्डीची होऊ नये याची दक्षता सर्वानी घ्यायला हवी. या पराभवातून योग्य तो धडा घेऊन आत्मपरीक्षण केल्यास भारत कबड्डीमध्ये पुन्हा सुवर्ण वर्चस्व निर्माण करु शकेल.

– श्याम बसप्पा ठाणेदार (दौंड जिल्हा, पुणे) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)