भारतासमोर आज आयर्लंडचे आव्हान 

पहिला टी-20 क्रिकेट सामना 


भारताच्या इंग्लंड दौऱ्याला प्रारंभ 


सामन्याची वेळ- रात्री 8-30 पासून. 

डब्लिन – भारतीय क्रिकेट संघाच्या बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याला आजपासून आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्याने सुरुवात होत असून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने आज होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्लंड संघाने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 5-0 ने व्हाईटवॉश दिला. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे ही खूप दुर्मिळ बाब असून इंग्लंडच्या संघाला पराभूत करणे सोपे नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना आगामी कसोटी मालिकेपूर्वी सराव करण्याच्या दृष्टीने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकांना महत्त्व आले आहे.

शनिवारी डब्लिनला पोहोचलेल्या भारतीय संघाने आपला सराव मर्चंट्‌स टेलर्स स्कूलच्या मैदानावर सुरू केला. ज्यात सर्व खेळाडूंनी तीन वेगवेगळ्या विभागात सराव केला. ज्यात उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार आणि हार्दिक पांड्या आणि सिद्धार्थ कौल यांनी वेगवान गोलंदाजीचा सराव केला, तर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी क्षेत्ररक्षणाचा सराव केला. त्याच वेळी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी फिरकी आणि वेगवान गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या भारतीय संघात सहभागी होण्यासाठी कमालीची चढाओढ पहायला मिळत आहे. ज्यात लोकेश राहुल, सुरेश रैना, अजिंक्‍य रहाणे, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक यांच्यात सर्वात जास्त चुरस पाहायला मिळत आहे. सध्या अजिंक्‍य रहाणेला केवळ कसोटी संघात समाविष्ट केल्याने लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. तर सुरेश रैना वेगवान फलंदाज आणि उपयुक्‍त गोलंदाजही असल्याकारणाने त्याचा समावेशही निश्‍चित मानला जात आहे. महेंद्रसिंग धोनी संघात असल्यामुळे उरलेल्या एका जागेसाठी दिनेश कार्तिक आणि मनीष पांडे यांच्यात संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस लागेल.

दरम्यान भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडच्या 14 सदस्यीय संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक गॅरी विल्सनकडे देण्यात आले आहे. भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्याआधी 27 व 29 जून रोजी होणाऱ्या या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेला भारताच्या आगामी कसोटी दौऱ्यामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आयर्लंडच्या संघातील गॅरी विल्सन, माजी कर्णधार विल्यम पोर्टरफील्ड व केविन ओब्रायन या तिघांना भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. परंतु पंजाबमध्ये जन्मलेला परंतु आता आयर्लंडकडून खेळणारा फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंग याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. सिमी सिंग या टोपणनावाने ओळखला जाणारा हा खेळाडू पहिल्यांदाच आपल्या मूळ देशाविरुद्ध खेळणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व सिद्धार्थ कौल.
आयर्लंड संघ – 
गॅरी विल्सन (कर्णधार व यष्टीरक्षक), अँड्रयू बॉलबर्नी, पीटर चेस, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटल, अँडी मॅकब्रायन, केविन ओब्रायन, विल्यम पोर्टरफील्ड, स्टुअर्ट पॉयंटर, बॉईड रॅंकिन, जेम्स शॅनॉन, सिमरनजित सिंग, पॉल स्टर्लिंग व स्टुअर्ट थॉम्पसन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)