भारतासमोर अंतिम लढतीत आज मालदीवचे आव्हान

सॅफ फुटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताला आठव्या विजेतेपदाची प्रतीक्षा 
ढाका – सलग तीन विजयांमुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय फुटबॉल संघासमोर सॅफ फुटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेतील उद्या (शनिवार) रंगणाऱ्या अंतिम सामन्यात मालदीवचे आव्हान आहे. दक्षिण आशियाई स्तरावर वर्चस्व मिळविलेल्या भारतीय संघाला सलग तिसऱ्या आणि एकूण आठव्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघात केवळ एक अपवाद वगळता बाकी सर्व खेळाडू 23 वर्षांखालील संघातील आहेत. परंतु या तरुण संघाने गटसाखळीतील दोन सामन्यांसह एकूण तीनही लढती जिंकून अपराजित राहताना अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने पहिल्या गटसाखळी लढतीत श्रीलंकेला 2-0 असे पराभूत केले, तर दुसऱ्या गटसाखळी सामन्यात मालदीववर 2-0 अशा फरकाने मात केली. अत्यंत रंगतदार अशा उपान्त्य सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करीत निर्णायक लढतीत स्थान मिळविले.

भारतीय संघाने या स्पर्धेत 2003 वगळता गेल्या सर्व 11 आवृत्त्यांमध्ये अंतिम फेरी गाठताना सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर मालदीवला गेल्या तीनही आवृत्त्यांमध्ये उपान्त्य फेरीतच पराभव पत्करावा लागला आहे. याआधी बांगला देशमधील ढाका येथील बंगबंधू स्टेडियममध्ये ही स्पर्धा 2009 मध्ये झाली होती. त्या वेळी भारत व मालदीव यांची अंतिम फेरीत गाठ पडली होती. निर्धारित वेळेत, तसेच जादा वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नसल्यामुळे या लढतीचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावावा लागला होता व त्यात भारताने बाजी मारली होती.

उद्याच्या अंतिम सामन्यात त्या वेळेची पुनरावृत्ती व्हावी, अशी भारतीय प्रशिक्षक कॉन्स्टंटाईन यांची निश्‍चितच इच्छा नसणार. परंतु मालदीवला किमान अंतिम सामन्यात तरी कमी लेखता येणार नाही हा धडा त्या सामन्याने भारताला दिला आहे. त्यामुळे उद्याही भारतीय खेळाडूंना मालदीवविरुद्ध गाफील राहता येणार नाही. उपान्त्य फेरीत नेपाळवर 3-0 असा विजय मिळवून त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला आहे. त्यातच गटसाखळीत भारताविरुद्ध न खेळलेल्या तीन खेळाडूंना मालदीव संघ उद्या मैदानात उतरविणार आहे. त्यांच्याकडे खास लक्ष ठेवावे लागणार असल्याची कबुली कॉन्स्टंटाईन यांनी दिली आहे.

पाकिस्तानविरुद्ध दोन गोल करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा अव्वल आक्रमक मनानवीर सिंग म्हणाला की, आमची सांघिक कामगिरी निश्‍चितच चांगली होत आहे. आक्रमण व बचावफळीतील खेळाडूंमधील उत्तम समन्वय हे आमचे बलस्थान म्हणावे लागेल. इतकेच नव्हे तर आम्ही आम्ही मालदीवबद्दल पूर्ण आदर ठेवूनच या लढतीत खेळणार आहोत. विजेतेपद हेच आमचे लक्ष्य आहे.

मालदीवला विजेतेपदाची संधी 
सॅफ स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची ही दुर्मिळ संधी असल्याचे सांगून मालदीवचे प्रशिक्षक पीटर सेग्रट म्हणाले की, अंतिम फेरीत धडक मारणे ही कामगिरी अभिमानास्पदच आहे. परंतु भारतीय संघाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. भारतीय संघ दर्जेदार असून गोल करण्याची एकही संधी गमावली नाही तर आम्ही त्यांना कडवी झुंज देऊ शकू. मालदीवचा कर्णधार अक्रम अब्दुलनेही संघाच्या कामगिरीबद्दल आत्मविश्‍वास व्यक्‍त केला. आम्ही नऊ वर्षांनंतर अंतिम पेरीत धडक मारली असून ही संधी साधण्यासाटी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)