भारताला धक्‍का देत मालदीवला विजेतेपद 

सॅफ फुटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धा 
ढाका – सात वेळच विजेत्या भारतीय फुटबॉल संघावर 2-1 अशी सनसनाटी मात करताना मालदीवने सॅफ फुटबॉल स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकावले. या स्पर्धेत मालदीवचे हे पहिलेवहिले विजेतेपद ठरले. मालदीवकडून हुसेन इब्राहिम माहुधीने 19व्या मिनिटाला, तसेच अली फाजिरने 66व्या मिनिटाला गोल केले. भारताकडून एकमेव गोल सुमित पास्सीने केला.

त्याआधी अत्यंत उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या अंतिम लढतीत पहिले आक्रमण भारतीय संघाने केले. मानवलीरने डाव्या बगलेवरून चाल करीत मालदीवच्या गोलपर्यंत धडक मारली. परंतु त्याचा दुबळा फटका मालदीवचा गोलरक्षक मोहम्मद फैसलने सहज अडविला. पाठोपाठ आशिकने पुन्हा एकदा डाव्या विंगवरून आक्रमण करीत मानवीरकडे पास दिला. परंतु मानवीरचा हेडर अगदी थोडक्‍यात चुकल्याने भारताची संधी हुकली. त्यानंतरही भारताने दोन चांगले प्रयत्न केले. परंतु मालदीवची बचावफळी आणि गोलरक्षक फैसलच्या कौशल्यामुळे भारताला गोल करण्यात अपयश आले.

अखेर ही कोंडी मालदीवनेच फोडली. हुसेन इब्राहिम माहुधीने एकट्यानेच चाल करताना भारतीय बचावफळीतून मार्ग काढला आणि कोणालाही काही कळण्याच्या आतच भारतीय गोलरक्षक विशाल कैथला चकवीत लक्ष्यवेध करून त्याने मालदीवला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 19व्या मिनिटाला बसलेल्या या धक्‍क्‍यातून सावरणे भारतीय खेळाडूंना कठीण गेले.

मालदीवने 34व्या मिनिटाला नुमानच्या जागी अक्रम अब्दुल घनी याला मैदानात उतरविले. दरम्यान भारताचे दोन प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांची पिछाडी कायम राहिली. 44व्या मिनिटाला भारतीय कर्णधार सुभाशिष बोस याला धसमुसळ्या खेळाबद्दल पंचांनी यलो कार्ड दाखवून तंबी दिली. मध्यंतराला मालदीवने 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. मध्यंतरानंतर 66व्या मिनिटाला हमझाच्या पासवर अली फाजिरने मालदीवचा दुसरा गोल करताना भारतावर दडपण आणले. इंजुरी टाईममध्ये सुमित पास्सीने निखिलच्या पासवर 92व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल केला. परंतु त्याला फार उशीर झाला होता.

भारतीय संघाने या स्पर्धेत 2003 चा एकमेव अपवाद वगळता सर्व 11 स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आणि त्यातील सात वेळा विजेतेपद पटकावले. मालदीवला मात्र गेल्या सलग तीन स्पर्धांमध्ये उपान्त्य फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. याआधी 2009 च्या अंतिम फेरीत भारताने मालदीवचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तब्बल नऊ वर्षांनी मालदीवने त्या पराभवाची परतफेड केली.

त्याआधी भारतीय संघाने पहिल्या गटसाखळी लढतीत श्रीलंकेला 2-0 असे पराभूत केले होते, तर दुसऱ्या गटसाखळी सामन्यात मालदीववर 2-0 अशा फरकाने मात केली होती. त्यानंतर चुरशीच्या उपान्त्य सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करीत अंतिम पेरीत धडक मारली होती. मालदीवने उपान्त्य फेरीत नेपाळवर 3-0 असा विजय मिळवून आपले आव्हान पेश केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)