नवी दिल्ली : भारतीय न्यायालयांकडून फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने याविषयी माहिती समोर आणली आहे. 2017 साली त्याआधीच्या वर्षापेक्षा फाशीच्या शिक्षा ठोठावण्यात 20 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी भारतातील न्यायालयांनी 109 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली मात्र त्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली नाही असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.
2016 साली 136 जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर 2017 साली त्यात 27 ने घट झाल्याचे अॅम्नेस्टीच्या
“डेथ सेनटेन्स अँड एक्झीक्युशन्स 2017” या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अॅम्नेस्टीचा हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या फाशीच्या शिक्षांमध्ये 51 जणांना हत्या केल्याबद्दल मृत्युदंड ठोठावला गेला तर 2016 साली 87 जणांना हत्येच्या गुन्ह्यात फाशी ठोठावली गेली होती असे अॅम्नेस्टीने लंडनस्थित नॅशनल लॉ युनिवर्सिटीच्या सेंटर ऑन डेथ पेनल्टी विभागाच्या आकडेवारीच्या मदतीने स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2015 साली भारतातील आजवरची शेवटची फाशी देण्यात आली होती. याकूब मेमन याला ही फाशी देण्यात आली होती. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही सर्व माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक तावांडा मुत्साह यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा