भारताने एक सर्जिकल स्ट्राईक केल्यास आम्ही दहा करू

पाकिस्तानची दर्पोक्ती: म्हणे, आमच्या क्षमतांबाबत शंका घेऊ नये
इस्लामाबाद -भारताने आमच्या भूमीत जर एक सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस केले; तर प्रत्युत्तरादाखल आम्ही तशाप्रकारचे दहा हल्ले करू. आमच्या विरोधात कुठले दु:साहस करण्याचा विचार करणाऱ्यांनी आमच्या क्षमतांबाबत कुठली शंका घेऊ नये, अशी धमकीवजा दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या समवेत दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी लंडनमध्ये पत्रकारांशी बोलताना भारतविरोधी मुक्ताफळे उधळली. भारताने दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानबरोबरची चर्चाप्रक्रिया थांबवली आहे. दोन्ही अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांमधील संबंध काही काळापासून ताणले गेले आहेत. त्यातून बऱ्याचदा दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध भडकते. गफूर यांनी पाकिस्तानी लष्कराची खुमखुमी दाखवताना परकी भूमीतही ते शाब्दिक युद्ध सुरूच ठेवले.

-Ads-

लष्कराच्या प्रभावामुळे पाकिस्तानची लोकशाही कूचकामी मानली जाते. मात्र, पाकिस्तानमधील लोकशाही बळकट व्हावी अशी लष्कराची इच्छा आहे. जुलैमध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत पारदर्शक ठरली. त्या निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब झाल्याचा कुणाकडे पुरावा असेल तर तो त्यांनी द्यावा, असेही गफूर यांनी म्हटले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पत ढासळलेली आहे. त्याचे खापर गफूर यांनी प्रसारमाध्यमांवर फोडले. पाकिस्तानात वाईटापेक्षा चांगल्या घडामोडी अधिक घडतात. आंतरराष्ट्रीय मीडियाने चांगल्या बाबींवरही प्रकाश टाकावा, असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)