भारताच्या मंगळयानाचे मंगळाभोवती 1,000 दिवस पूर्ण

बेंगळुरू (कर्नाटक), दि. 19-भारताच्या मंगळयानाने आज, 19 जून 2017 रोजी मंगळाच्या कक्षेत 1,000 दिवस पूर्ण केले आहेत. भारताच्या या कमी खर्चाच्या मंगळमोहीम प्रकल्पातील मंगळयानाचे अपेक्षित कार्य सुमारे सहा महिने इतकेच अपेक्षित होते. मात्र त्या पलीकडे जाऊन मंगळयानाने 1,000 दिवस पूर्ण केले असून अजूनही ते दीर्घकाळ मंगळाच्या कक्षेत फिरत राहणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

5 नोव्हेंबर 2013 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. 1 डिसेंबर 2013 रोजी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे गेले. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आणि ते आजतागायत मंगळाभोवती प्रदक्षिणा करतच आहे. त्यातील शिल्लक जादा इंधनाचा विचार करून मार्च 2015 मध्ये ते आणखी सहा महिने कार्यरत राहील असे इस्रोने जाहीर केले होते. आणि जून 2015 मध्ये इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी सांगितले, की मंगळयानात आणखी अनेक वर्षे पुरेल इतके इंधन आहे.

सुमारे 450 कोटी रुपये खर्चाच्या मंगळयानाचा उद्देश होता मंगळाच्या पृष्ठभागाच अभ्यास करणे, त्यातील खनिजांचे पृथक्करण करणे, मिथेनसठी वातावरणाचे स्कॅनिंग करणे आणि मंगळावर जीवसृष्टी आहे का हे पाहणे. मंगळयानावर एलएपी (लिमन अल्फा फोटोमीटर), एमएमएस (मिथेन सेन्सर फॉर मार्स),एमईएससीए (मार्स एक्‍झोस्फेरिक न्यूट्रल कंपोझिशन ऍनेलिसिस), एमसीसी (मार्स कलल कॅमेरा) आणि टीआयएस (थर्मल इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रोमीटर) अशी पाच उपकरणे आहेत.

या काळात मंगळयानाने मंगळाभोवती 388 प्रदक्षिणा मारल्याची, 715 प्रतिमा पाठविल्याची माहिती इस्रोने दिली आहे.मंगळयानाने पाठविलेल्या माहितीचा अभ्यास चालूच असल्याचेही इस्रोने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)