भारताच्या पुरुष संघाने रशियाला रोखले

बुद्धिबळ ऑलिम्पियाड : महिलांची अमेरिकेशी बरोबरी

बाटुमी – पाच वेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंदच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय पुरुष संघाने बलाढ्य रशियाला बरोबरीत रोखताना येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत आश्‍चर्यकारक निकालाची नोंद केली. तसेच भारताच्या महिला संघानेही विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेला बरोबरीत रोखताना अनपेक्षित कामगिरी बजावली. त्यामुळे स्पर्धेच्या सहाव्या फेरीत भारतीय संघांची कामगिरी चर्चेचा विषय ठरली.

-Ads-

संगणकाच्या विश्‍लेषणानुसार रशियाचा ग्रॅंडमास्टर इयान नेपोमनियाचीविरुद्ध आनंदची स्तिती अतिशय खराब होती व पराभव टाळण्यासाठी त्याची स्थिती निराशाजनक होती. परंतु तब्बल 12 वर्षांनंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत परतलेल्या आनंदने संगणकाचे भाकित खोटे ठरविताना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. अत्यंत नियोजनबद्ध प्रतिआक्रमण करून नेपोमनियाचीला बरोबरीत रोखताना आनंदने रशियन संघाच्या विजयाच्या आशा उद्‌ध्वस्त केल्या.

पहल्यिाच पटावर रशियन संघाची अशा प्रकारे निराशा होत असताना दुसऱ्या पटावरही भारताचा युवा खेळाडू पेन्डलया हरिकृष्णाने माजी जगज्जेता व जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू व्लादिमीर क्रॅमनिकला बरोबरीत रोखून भारताला दुसरा चांगला निकाल मिळवून दिला. त्यानंतर तिसऱ्या पटावर विदित गुजराथीने निकिता विटुइगोव्हला, तसेच चौथ्या पटावर बी. अधिबनने दमित्री जाकेवेन्कोला बरोबरीत रोखताना गुणविभागणी मान्य करायला भाग पाडले. परिणामी विजेतेपदासाठी आपले सथान निश्‍चित करण्याकरिता धडपडणाऱ्या रशियन संघाला जबरदस्त धक्‍का बसला.

महिला गटांत तर सध्या अग्रस्थानी असलेल्या अमेरिकेवर भारतीय महिला संघाने जवळजवळ मात केली होती. परंतु अखेरच्या क्षणी त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. कोनेरू हंपीने पहिल्या पटावर ऍना झाटोनसिखला, तर तानिया सचदेवने तिसऱ्या पटावर जेनिफर अब्राहमेवला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना चमकदार विजयांची नोंद करून भारताला सनसनाटी निकालाची संधी मिळवून दिली होती. परंतु दुसऱ्या पटावर डी. हरिकाला इरिना कृशविरुद्ध आणि चौथ्या पटावर ईशा करवडेला काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले.

आता आणखी पाच पेऱ्या बाकी असताना पुरुष गटांत अझरबैजान आणि महिला गटांत पोलंड यांनी अग्रस्थानी झेप घेतली आहे. अझरबैजानने झेक प्रजासत्ताकाचा 3-1 असा पराभव केला. तर पोलंडने महिला गटांत युक्रेनवर 2.5-1.5 अशा फरकाने विजयाची नोंद केली. याशिवाय महिला गटांत बलवान रशियाला पराभवाचा सामना करावा लागल्याने खळबळजनक निकालाची नोंद झाली.

अर्मेनियाने रशियन महिलांना नमवून विजेतेपदाच्या शर्यतीत उडी घेतली. त्याआधी गतविजेत्या रशियाच्या महिला संघाला उझबेकिस्तानविरुद्ध 1.5-2,5 असा खळबळजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे रशियन महिलांचे स्पर्धेतील आव्हान धोक्‍यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)