भारताच्या पराभवामुळे बांगलादेशच्या चाहत्याने केली आत्महत्या

ढाका (बांगलादेश): चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने भारताला हरवल्यामुळे, नाराज झालेल्या बांगलादेशच्या चाहत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी दारूण पराभव केला. या पराभवामुळे अनेकांचा बांध फुटला. कोणी टीव्ही फोडले तर कोणी जाहीर नाराजी व्यक्त केली.
मात्र बांगलादेशी चाहत्याने टोकाचे पाऊल उचलले. बिद्युत या 25 वर्षीय बांगलादेशी चाहत्याने थेट रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली.
बिद्युत हा भारतीय संघाचा मोठा चाहता होता. अंतिम सामन्यामधील भारतीय संघाच्या पराभवामुळे तो खूपच निराश झाला होता. त्यामुळेच नाराज झालेल्या बिद्युतने रेल्वेखाली उडी घेतली.
जगाचे लक्ष लागलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने आपले नाव कोरले आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतीस संघाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळाले. पाकिस्तानी संघाने ठेवलेले 339 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)