आशियाई क्रीडास्पर्धेतील ऍथलेटिक्‍समध्ये भारताचा सोनेरी प्रारंभ 
जकार्ता, दि. 25 – भारताच्या तेजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेकीत तब्बल 20.75 मीटरची विक्रमी फेक करताना येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. तेजिंदरने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवताना सर्व स्पर्धकांमध्ये पहिले स्थान राखले होते. तेजिंदरने पाचव्या प्रयत्नांत स्पर्धाविक्रमाची नोंद करताना विजयी फेक केली.

तेजिंदरने पहिल्या प्रयत्नांत 19.96 मीटर पर्यंत गोळाफेक करून पहिले स्थान कमावले होते. त्यानंतर त्याला दुसऱ्या प्रयत्नांत 19.15 मीटर गोळा फेकता आला. मात्र कोणताही प्रतिस्पर्धी जवळपास नसल्याने त्याने आपले पहिले स्थान कायम राखले होते. मात्र तिसऱ्या प्रयत्नांत त्याची फेक चुकल्याने फाऊल घोषित करण्यात आला. तरीही त्याच्या पहिल्या स्थानाला कोणताही धोका पोहोचला नव्हता.

दरम्यान, सौदी अरेबियासाठी तीन सुवर्णपदके जिंकणाऱ्या सुलतान अब्दुलमाजीद अल्हेबशीला पहिल्या तिन्ही प्रयत्नांत अपयश आल्याने तो पदकाच्या शर्यतीतून बाद झाला. त्यामुळे तेजिंदरपालच्या पदकाच्या आशा उंचावल्या. तेजिंरदरने चौथ्या प्रयत्नांत पुन्हा 19.96 मीटरची फेक करताना पहिले स्थान काबीज केले. तर आपल्या पाचव्या आणि अखेरच्या प्रयत्नांत 20.75 मीटर अंतरावर गोळाफेक करतानात्याने नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी या स्पर्धेतील हे सातवे सुवर्ण ठरले असून भारतीय खेळाडूंचे आजच्या दिवसातील एकमेव सोनेरी यश ठरले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)